‘आमची माती, आमचा खेळ’ हे ब्रीदवाक्य जपून सुरू झालेल्या महाकबड्डी लीगला शुक्रवारपासून झोकात प्रारंभ झाला. कर्णधार नेहा घाडगेच्या दिमाखदार खेळाच्या बळावर महिलांमध्ये बारामती हरिकेन्सने, तर नीलेश साळुंखेच्या शानदार खेळामुळे पुरुषांमध्ये ठाणे ठंडर्सने मुंबई डेव्हिल्सला पराभवाचा धक्का दिला.
महाकबड्डी लीगच्या लिलावामध्ये सर्वात जास्त बोली लागलेल्या बारामतीच्या नेहा घाडगेने अपेक्षेप्रमाणेच आपल्या खेळाने कबड्डीरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तिने ६ बोनस गुणांसह एकूण ११ गुण चढायांमध्ये मिळवले. तिला चढायांमध्ये तोलामोलाची साथ लाभली ती स्नेहल शिंदेची (१२ गुण). बारामतीने पहिल्या सत्रात २१-१६ अशी आघाडी घेतली आणि मग ४१-३४ असा सामना खिशात घातला. दोन्ही संघांनी एकमेकांवर प्रत्येकी दोन लोण चढवले. पुणे संघाकडून कर्णधार पूजा किणीने सामना वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करताना चढायांचे ९ गुण कमवले, तर मीनल जाधवने (६ गुण) तिला छान साथ दिली.
‘‘महाकबड्डीच्या पहिल्याच सामन्याचे प्रचंड दडपण होते. प्रतिस्पर्धी संघसुद्धा बलवान होता. परंतु आम्ही चांगली तयारी केली होती. त्यामुळे विजयी सलामी नोंदवल्याचा अतिशय आनंद होत आहे,’’ अशी प्रतिक्रिया नेहा घाडगेने सामन्यानंतर व्यक्त केली.
पुरुषांमध्ये ठाणे थंडर्सने पहिल्याच सत्रात दोन लोणसहित ३७-२४ अशी आघाडी घेतली आणि अखेर ५९-४६ अशा फरकाने सामना जिंकला. ठाण्याकडून नीलेश साळुंखेने दमदार चढायांचे १९ गुण मिळवत सामनावीर किताब पटकावला, त्याला सूरज देसाईने चढायांचे १६ गुण घेत उत्तम साथ दिली. तर सूरज बनसोडेने भक्कम पकडी केल्या. मुंबईकडून उमेश म्हात्रेने चढायांचे ९ गुण मिळवून झुंजार प्रयत्न केले.
कबड्डीरसिकांचा अल्प प्रतिसाद
मे महिन्यात मुंबईचे चाकरमानी कबड्डीरसिक गावाला गेल्यामुळे महाकबड्डीच्या पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा तुटपुंजा प्रतिसाद लाभला. श्रमिक जिमखाना येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या मुंबई महापौर चषक कबड्डी स्पध्रेतही याचीच प्रचीती आली होती. महाकबड्डीच्या पहिल्या दिवशी प्रेक्षागृहात एक हजार कबड्डीरसिक हजर होते. मात्र यात खास आमंत्रितांची संख्या प्रचंड होती, तर तिकीट काढणाऱ्यांची संख्या मात्र कमी होती.
अभिलाषा, स्नेहलचा खेळ मुंबईत नाही
आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या महिला कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे आणि स्नेहल साळुंखे यांचा खेळ पाहायची संधी मुंबईकरांना मिळणार नाही. कारण अभिलाषा रायगड डायनामोज संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे, तर स्नेहल सांगली रॉयल्स संघाकडून खेळत आहे. परंतु रायगड आणि सांगली या दोन्ही संघांचे मुंबईत सामनेच होत नसल्यामुळे कबड्डीरसिकांचा हिरमोड होणार आहे.