‘प्रो-कबड्डी’लीगच्या घवघवीत यशानंतर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने पहिल्यांदाच महाकबड्डी लीगचे आयोजन केले असून शुक्रवारपासून या स्पर्धेचा थरार दर्दी चाहत्यांना अनुभवता येणार आहे. राज्य कबड्डी असोसिएशन आणि मॅक्स गॉडविट कंपनी यांच्यांमध्ये पाच वर्षांचा करार झाला असून या दोघांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.
या स्पर्धेत पुरुष आणि महिलांचे प्रत्येकी आठ संघ असणार असून त्यांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण १५ लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
ही स्पर्धा काही वर्षांमध्ये साता समुद्रापार नेण्याचा आयोजकांचा मानस आहे.
या स्पर्धेचे दोन मोसम खेळवण्यात येणार असून दुसरा मोसम नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये खेळवण्यात येणार आहे. पहिला मोसम १५ मे ते ७ जून दरम्यान मुंबई, रत्नागिरी, रायगड, पुणे या चार शहरांमध्ये होणार आहे, तर दुसरा मोसम ठाणे, बारामती, सांगली आणि अहमदनगर या ठिकाणी रंगणार आहे.
प्रत्येक संघामध्ये दहा खेळाडू असतील. खेळणाऱ्या सात खेळाडूंपैकी तीन खेळाडू राष्ट्रीय स्तरावरील असतील तर अन्य चार खेळाडूंमध्ये जिल्हास्तरीय, कनिष्ठ गट, विद्यापीठ दर्जाच्या खेळाडूंचा सहभाग असेल. मुंबईत ही स्पर्धा वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या संकुलामध्ये होणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील कबड्डीचा आवाज हरवला होता, पण या स्पर्धेमुळे तो आवाज महाराष्ट्राला परत मिळणार आहे. ही स्पर्धा म्हणजे होतकरू खेळाडूंसाठी संस्कृतीपीठ असेल. देशाच्या इतिहासात महिला कबड्डीपटूंसाठी ही पहिलीच लीग असेल. सारेच खेळाडू ही स्पर्धा खेळभावनेने खेळतील, अशी मला आशा आहे.
-दत्ता पाथ्रीकर,  महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष

महाराष्ट्रातल्या मातीत वाढलेल्या कबड्डी या खेळाची लीग साकारत असल्याचा आम्हाला फार आनंद होत आहे. या लीगचा खेळाला चांगलाच फायदा होईल, त्याचबरोबर खेळाडूंसाठी हे एक चांगले व्यासपीठ असेल. ही स्पर्धा मॅटवर होत असल्याने या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जावरही फायदा होईल.
-सिद्धार्थ मेहता,  मॅक्स गॉडविटचे सीईओ.

स्पर्धेचे स्वरूप
*स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिलांचे प्रत्येकी आठ संघ असतील
*आठ संघांची अ आणि ब अशा गटांमध्ये विभागणी करण्यात येईल
*स्पर्धा साखळी आणि त्यानंतर बाद फेरीने खेळवली जाईल
*प्रत्येक दिवशी पुरुष व महिला विभागाचा एकेक सामना होईल

स्पर्धेचे नियम
*प्रत्येक चढाई ३० सेकंदाची असेल
*तीन चढायांमध्ये एकही गुण न मिळवल्यास खेळाडूला बाद ठरवण्यात येईल
*पाठलाग करून प्रत्येक खेळाडूला बाद केल्यावर चढाईपटूला दोन गुण मिळतील
*साखळी फेरीतील सामना बरोबरीत सुटल्यास सुवर्णचढाईचा अवलंब केला जाईल
*सामना जिंकल्यावर दोन गुण मिळतील आणि सामना रद्द झाल्यास प्रत्येक संघाला एक गुण मिळेल

आजचे सामने
पुरुष विभाग (अ-गट) : मुंबई डेव्हिल्स वि. ठाणे टायगर्स
महिला विभाग (ब-गट) : पुणे पँथर्स वि. बारामाती हरिकेन्स
k07