एकीकडे महिला सबलीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल म्हणून महिला आरक्षणावर चर्चा चालू असताना दुसरीकडे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये एका महिलेनं आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय क्रिकेट पंच पॅनलसाठीच्या परीक्षेचे निकाल समोर आले असून त्यामध्ये डॉ. भाग्यश्री डांगे या उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे आता त्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी पंच म्हणून भूमिका बजावणार आहेत.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे जुलै व ऑगस्टमध्ये राज्यस्तरीय क्रिकेट पंच पॅनलसाठी परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा लेखी व प्रात्याक्षिक अशा दोन प्रकारे घेण्यात आली. यात लेखी परीक्षा १०० गुणांची तर प्रात्याक्षिक परीक्षेसाठी १०० गुण होते. एकूण अर्जदारांपैकी लेखी परीक्षेला १९७ उमेदवार बसले होते. त्यापैकी ८० जणांची निवड प्रात्याक्षिक परीक्षेसाठी करण्यात आली. यामध्ये भाग्यश्री डांगेंचा समावेश होता. त्यांना लेखी परीक्षेत १०० पैकी ८४ गुण मिळाले आहेत.




प्रात्याक्षिक परीक्षेचं स्वरूप
प्रात्याक्षिक परीक्षेमध्ये तीन गोष्टींचा समावेश होता. यात मुलाखतीसाठी ५० गुण, व्हिडीओ अनॅलिसिससाठी ३० गुण, तर पीपीटी प्रेझेंटेशनसाठी २० गुण असे १०० गुण देण्यात आले. या फेरीत भाग्यश्री डांगे यांना १०० पैकी ८७ गुण मिळाले. त्यामुळे लेखी व प्रात्याक्षिक अशा दोन्ही परीक्षांचे मिळून भाग्यश्री डांगे यांना २०० पैकी १७१ गुण मिळाले.
४८ उमेदवार झाले उत्तीर्ण!
दरम्यान, या परीक्षेत एकूण ४८ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यात भाग्यश्री डांगेंचाही समावेश आहे. त्यामुळे आता लवकरत भाग्यश्री डांगे या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी पंच म्हणून कामगिरी निभावताना दिसणार आहेत.