पंचकुला : महाराष्ट्राने रविवारी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत पाच सुवर्ण, तीन रौप्य आणि पाच कांस्यपदकांची कमाई केली. जलतरणात अपेक्षा फर्नाडिसने दोन सुवर्णपदके जिंकत महत्त्वपूर्ण योगदान दिले. यासह तिरंदाजीत साताऱ्याच्या आदिती स्वामीने सुवर्णवेध घेतला. टेबल टेनिसमध्ये दिया चितळेने सुवर्णपदक जिंकले.  

युवा खेळाडूंनी केलेल्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राने पदकतालिकेतील अग्रस्थान कायम राखले आहे. महाराष्ट्राच्या खात्यावर ४१ सुवर्ण, ३६ रौप्य आणि २९ कांस्य अशी एकूण १०६ पदके जमा आहेत. दुसऱ्या स्थानावरील हरयाणाने महाराष्ट्राच्या तुलनेत अधिक पदके मिळवली असली तरी सुवर्णपदकांमध्ये ते पिछाडीवर आहेत. हरयाणाने आतापर्यंत या स्पर्धेत ३९ सुवर्ण, ३४ रौप्य आणि ४२ कांस्य अशी ११५ पदके कमावली आहेत.

रविवारी जलतरणात अपेक्षाने ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये ३३.७८ सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर तिने २०० मीटर बटरफ्लायमध्येही सुवर्णपदक आपल्या नावे केले. या प्रकारात तिने २:१८.३९ सेकंदाची वेळ नोंदवून भारतातील सर्वोत्तम वेळेची नोंद केली. ४ बाय १०० फ्रीस्टाईल रिलेमध्ये मुलांच्या संघाला रौप्यपदक मिळाले. या संघात अर्जुनवीर गुप्ता, ऋषभ दास, उत्कर्ष गौर आणि आर्यन वर्णेकर यांचा समावेश होता.

तिरंदाजीत साताऱ्याच्या आदिती स्वामीने सुवर्ण कामगिरी करताना पंजाबच्या अवनित कौरचा १४४-१३७ असा पराभव केला. अहमदनगरच्या पार्थ कोरडेला मुलांच्या लढतीत आंध्र प्रदेशच्या व्यंकीकडून १४५-१४४ असे अवघ्या एका गुणाने पराभूत व्हावे लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. टेबल टेनिसमध्ये मुलींच्या एकेरीत दीयाने दिल्लीच्या लतिका नारंगचा पराभव करत सुवर्ण कमाई केली. तसेच सिमरन वर्मा (मुंबई), रशिका होले (सातारा), आदित्य गौड (पुणे), माणिक सिंग (अकोला), सई डावखर (पुणे) यांनी बॉिक्सगमध्ये कांस्यपदके कमावली.

मल्लखांबमध्ये वैयक्तिक पोल प्रकारात मुंबईच्या ऋषभ घुबडेने सुवर्ण, तर हँगिंगमध्ये जळगावच्या चेतन मानकरेने रौप्यपदक मिळवले.

महाराष्ट्राचे दोन्ही खो-खो संघ अंतिम फेरीत

महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांनी खेलो इंडिया स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. मुलींनी पश्चिम बंगालचा, तर मुलांनी दिल्लीचा पराभव केला. महाराष्ट्राच्या मुलींनी बंगालवर ९-८ (९-३) असा एक डाव व एका गुणाने मात केला. महाराष्ट्रातर्फे अश्विनी शिंदे आणि प्रीती काळेने चांगला खेळ केला. मुलांमध्ये महाराष्ट्राने दिल्लीवर १५-९ (१५-५) असा १ डाव व ६ गुणांनी विजय मिळवला. विजयी संघातर्फे आदित्य कुडाळेने (२.३० मि. संरक्षण व १ बळी) आणि मिलद आर्यन (२.३० मि. संरक्षण आणि एक बळी) यांनी चमक दाखवली.