पुणे : महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावातही गोवा संघाची फिरकी घेतली. त्यानंतर विजयासाठी आवश्यक १०८ धावांचा पाठलग २१.१ षटकांतच पार करत महाराष्ट्राने गोवा संघाचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ ‘ब’ गटात आघाडीवर आला आहे.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात तिसऱ्या दिवसअखेरच्या ६ बाद २१० धावसंख्येवरुन पुढे खेळायला सुरुवात केल्यावर गोवा संघाचा डाव फार काळ तग धरू शकला नाही. आणखी २४ षटके खेळून गोव्याला ३८ धावांचीच भर घालता आली. गोवा संघाचा संपूर्ण डाव महाराष्ट्राच्या जलज सक्सेना (५/८१), हितेश वाळुंज (४/६३), विकी ओस्तवाल (१/५२) या फिरकी गोलंदाजांनी गुंडाळला. ऑफ-स्पिनर जलजने पहिल्या डावात सहा गडी बाद केले होते. गोव्याच्या दुसऱ्या डावात अभिनव तेजराणा (१०९) आणि दर्शन मिसाळ (६५) यांनाच चांगली फलंदाजी करता आली.

आव्हानासाठी १०८ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राने झटपट २ बाद १०९ धावा केल्या. पृथ्वी शॉ आणि नीरज जोशी ही बदलेली सलामीची जोडी २२ धावांत फुटली. पृथ्वी १७ धावांवर बाद झाल्यावर नीरज आणि अर्शिन यांनी दुसऱ्या गड्यासाठी ८४ धावांची भागीदारी करताना महाराष्ट्राचा विजय निश्चित केला. नीरज (२२) बाद झाल्यावर अर्शिनने (नाबाद ५२) अर्धशतक पूर्ण करत सिद्धार्थ म्हात्रेच्या (नाबाद १४) साथीत महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

बाद फेरीसाठी चुरस

महाराष्ट्राने ‘ब’ गटातून आघाडीचे स्थान मिळवले असले, तरी या गटातील बाद फेरीचे चित्र अजून स्पष्ट नाही. महाराष्ट्राचे सहा सामन्यांतून २४, तर दुसऱ्या स्थानावरील मध्य प्रदेशचे २२, कर्नाटकाचे २१ आणि सौराष्ट्राचे १९ गुण झाले आहेत. या गटात महाराष्ट्र विरुद्ध मध्य प्रदेश, कर्नाटक विरुद्ध पंजाब आणि सौराष्ट्र विरुद्ध चंडीगड अशा अंतिम साखळी लढती होणार आहेत. पहिल्या दोन क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश लढतीमधील विजेता संघच बाद फेरीत दाखल होईल. हा सामना इंदूरला होणार आहे. कर्नाटकाने निर्णायक विजय मिळविल्यास त्यांचे पारडे जड राहील. सौराष्ट्राला बोनस गुणांसहच विजय आवश्यक असेल, शिवाय त्यांना अन्य सामन्यांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागेल.