निखिल नाईक व श्रीकांत मुंढे यांनी केलेल्या शतकी भागीदारीमुळे महाराष्ट्राने विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत मुंबईवर ७५ धावांनी मात केली. या पराभवामुळे मुंबईचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने ५० षटकांत ७ बाद २७१ धावा केल्या. कर्णधार रोहित मोटवानी याने दमदार ४७ धावा करूनही महाराष्ट्राची ६ बाद १३६ अशी स्थिती झाली होती. पण नाईक व मुंढे यांनी आक्रमक खेळ करीत १९ षटकांमध्ये १०८ धावांची भर घातली आणि संघाला आश्वासक धावसंख्या रचण्यात मोठा वाटा उचलला. नाईक याने ९८ चेंडूंमध्ये ७८ धावा केल्या. त्यामध्ये त्याने सहा चौकार व दोन षटकार मारले. मुंढे याने ६२ चेंडूंमध्ये ७२ धावा करताना सहा चौकार व तीन षटकार अशी फटकेबाजी केली. मुंबईकडून सौरभ नेत्रावळकर व अभिषेक नायर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
विजयासाठी २७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांची दमछाक झाली. त्यांच्याकडून एकही मोठी भागीदारी झाली नाही. त्यामुळेच निर्धारित ५० षटकांत त्यांना ९ बाद १९६ धावांपर्यंतच मजल गाठता आली. धवल कुलकर्णीच्या नाबाद ३९ धावा, हीच त्यांच्याकडून झालेली सर्वाधिक खेळी होती. सिद्धार्थ चिटणीस (३८) याचेही प्रयत्न अपुरे ठरले. महाराष्ट्राकडून समद फल्लाह याने तीन तर अंकित बावणेने दोन बळी मिळवले.
संक्षिप्त निकाल : महाराष्ट्र- ५० षटकांत ७ बाद २७१ (निखिल नाईक ७८, श्रीकांत मुंढे नाबाद ७२, अभिषेक नायर २/२३) विजयी वि. मुंबई- ५० षटकांत ९ बाद १९६ (सिद्धार्थ चिटणीस ३८, धवल कुलकर्णी नाबाद ३९, समद फल्लाह ३/२७, अंकित बावणे २/२८).