महाराष्ट्राच्या मोनिक गांधी, रायना सलढाणा, केनिषा गुप्ता यांनी मिळविलेले सुवर्णपदक तसेच ४ बाय ५० मीटर फ्रीस्टाईल रिले शर्यतीमधील राष्ट्रीय विक्रम अशी शानदार सलामी करीत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय कुमार जलतरण स्पर्धेत उद्घाटनाचा दिवस गाजविला.
शिवछत्रपती क्रीडानगरीत सोमवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत गांधी हिने १७ वर्षांखालील मुलींमध्ये २०० मीटर फ्रीस्टाईल शर्यत २ मिनिटे ८.१९ सेकंदांत जिंकली. सलढाणा हिने १४ वर्षांखालील गटात हीच शर्यत २ मिनिटे ११.९४ सेकंदांत पार करीत सुवर्णपदक जिंकले. केनिषा हिने बारा वर्षांखालील गटात १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक शर्यत एक मिनिट २२.२२ सेकंदांत पार करीत प्रथम क्रमांक मिळविला.
मुलींच्या दहा वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ४ बाय ५० मीटर फ्रीस्टाईल शर्यत २ मिनिटे ११.३० सेकंदांत पार करीत राष्ट्रीय विक्रम नोंदविला. पलक धामी, संजिती साह, इबाका शहा व अन्वेषा जोहरे यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राने २००८ मध्ये स्वत:च नोंदविलेला २ मिनिटे १५.३० सेकंद हा विक्रम मोडला.
महाराष्ट्रास १२ वर्षांखालील मुलींमध्ये ४ बाय ५० मीटर फ्रीस्टाईल रिले शर्यतीत रौप्यपदक मिळाले. कर्नाटकने त्यांना मागे टाकून सोनेरी यश मिळविले तर तामिळनाडूला कांस्यपदक मिळाले. मुलांमध्ये या रिलेत महाराष्ट्रास कांस्यपदक मिळाले. दहा वर्षांखालील मुलांमध्येही महाराष्ट्राला तिसरे स्थान मिळाले.
वॉटरपोलोत महाराष्ट्राची विजयी सलामी
महाराष्ट्राने वॉटरपोलोतील मुलांच्या गटात झकास सलामी केली. त्यांनी कर्नाटकचा ११-३ असा धुव्वा उडविला. त्या वेळी त्यांच्याकडून कर्णधार सारंग वैद्य याने पाच गोल करीत सिंहाचा वाटा उचलला. शिवम घाडगे, यश जाधव यांनी प्रत्येकी दोन गोल करीत त्याला चांगली साथ दिली. कर्नाटकच्या धनुष याने तीन गोल केले.
अन्य लढतीत पंजाबने मणिपूरला ११-२ असे हरविले तर केरळने दिल्लीवर १०-२ अशी मात केली.