विजेतेपदासाठी महाराष्ट्राची कर्नाटकशी लढत

गुरुवारी होणाऱ्या अंतिम फेरीत त्यांच्यासमोर बलाढय़ कर्नाटकचे आव्हान उभे ठाकले आहे.

समद फल्लाह

मुश्ताक अली  क्रिकेट स्पर्धा

बलाढय़ रेल्वेवर २१ धावांनी मात; निखिल नाईकच्या नाबाद ९५ धावा

युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या महाराष्ट्राच्या संघाने मंगळवारी सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत दमदार सांघिक कामगिरीच्या बळावर रेल्वेचा २१ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता गुरुवारी होणाऱ्या अंतिम फेरीत त्यांच्यासमोर बलाढय़ कर्नाटकचे आव्हान उभे ठाकले आहे.

इंदूरच्या होळकर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यष्टीरक्षक फलंदाज निखिल नाईकने अवघ्या ५८ चेंडूंत आठ षटकार व चार चौकारांसह साकारलेल्या नाबाद ९५ धावांच्या तुफानी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने निर्धारित २० षटकांत ५ बाद १७७ धावा अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. नौशाद शेखने (५९) निखिलला सुरेख साथ दिली. दोघींनी तिसऱ्या गडय़ासाठी ११९ धावांची भागीदारी रचली. मात्र त्यांच्याव्यतिरिक्त एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही.

१७८ धावांचा पाठलाग करताना डावखुरा वेगवान गोलंदाज समद फल्लाहच्या भेदक माऱ्यापुढे रेल्वेचे फलंदाज ढेपाळले. सलामीवीर मृणाल देवधर (५५) व प्रथम सिंग (२९) यांनी पहिल्या गडय़ासाठी ६८ धावा रचल्या. मात्र फल्लाहने मृणालला बाद केले व रेल्वेचा डाव घसरला. फल्लाहने एकूण तीन फलंदाज बाद केले. फिरकीपटू सत्यजित बच्छाव व नौशाद यांनीदेखील प्रत्येकी दोन बळी बाद करत फल्लाहला उत्तम साथ दिली. त्यामुळे रेल्वेचा डाव २० षटकांत १५७ धावांत संपुष्टात आला.

सुपर लीगमधील सलग चारही सामने जिंकल्यामुळे महाराष्ट्राने १६ गुणांसह ‘अ’ गटातून अंतिम फेरी गाठली. तर ‘ब’ गटात कर्नाटकनेदेखील चार विजयांसह १६ गुण मिळवत अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. मुंबई, बंगाल यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र : २० षटकांत ५ बाद १७७ (निखिल नाईक नाबाद ९५, नौशाद शेख ५९; मनजीत सिंग २/३६) विजयी वि. रेल्वे : २० षटकांत सर्वबाद १५६ (मृणाल देवधर ५५, प्रथम सिंग २९; समद फल्लाह ३/३७).

गुण : महाराष्ट्र ४, रेल्वे ०

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra final in mushtaq ali cricket tournament

ताज्या बातम्या