राज्याच्या कुस्ती क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठेच्या ५७व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेस भोसरी येथे महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या क्रीडानगरीत रविवारी प्रारंभ होत आहे. स्पर्धेसाठी नामवंत मल्लांच्या आगमनामुळे तेथील वातावरण कुस्तीमय झाले आहे.    
ही स्पर्धा महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे भोसरी येथे चार दिवस चालणार आहे. ही स्पर्धा गादी व माती विभागात होणार असून दोन्ही विभागाकरिता ५५, ६०, ६६, ७४, ८४, ९६ किलो व महाराष्ट्र केसरी असे गट ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेत सर्व जिल्हे व शहर तालीम अशा ४४ संघांचे सहाशेहून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत. त्यामध्ये ऑलिम्पिकपटू नरसिंग यादव, दुहेरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, महाराष्ट्र केसरी समाधान घोडके, नंदू आबदार, महेश वरुटे, महादेव सरगर, सचिन मोहोळ, राहुल सणस, योगेश पवार यांचाही समावेश आहे. खेळाडूंची वजने रविवारी दुपारी ३ ते ४.३० या वेळेत होणार आहेत.
महाराष्ट्र केसरीपदाची लढत ४ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅटवर होणार आहे. हा किताब जिंकणाऱ्यास ज्येष्ठ कुस्ती संघटक मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा दिली जाणार आहे. स्पर्धेकरिता सत्तर हजार प्रेक्षक बसू शकतील एवढी गॅलरी उभी करण्यात आली आहे. दोन हजारहून अधिक पोलीस व खासगी स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी मातीचा एक आखाडा व आंतरराष्ट्रीय मॅट्सची दोन मैदाने तयार करण्यात आली आहेत.