"महाराष्ट्र केसरीची कुस्ती माझ्या सिकंदरनेच मारली होती, पण...", सिकंदरच्या वडीलांना अश्रू अनावर | Maharashtra Kesari wrestler sikandar sheikh's father expressed his grief | Loksatta

“महाराष्ट्र केसरीची कुस्ती माझ्या सिकंदरनेच मारली होती, पण…”, सिकंदर शेखच्या वडीलांना अश्रू अनावर

सिकंदर शेख यांचे वडील रशीद शेख हे देखील पैलवान आहेत. त्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या वादावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

sikander shaikh father rashid shaikh
सिकंदर शेख यांचे वडील रशीद शेख यांना अश्रू अनावर

यंदाची ६५ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा चांगलीच गाजत आहे. १४ जानेवारी रोजी पुण्यामध्ये महाराष्ट्र केसरीसाठी लढत झाली. यावेळी माती विभागातील फायनल कुस्ती मोहोळ गावचा सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात झाली. यामध्ये पंच कमिटीकडून सिकंदर शेखवर अन्याय झाल्याचा आरोप राज्यभरातून होत आहे. सोशल मीडियावरही याबाबत संताप व्यक्त होत आहे. त्यानंतर सिकंदरच्या वडिलांनीही खंत बोलून दाखविली आहे. “महाराष्ट्र केसरीची कुस्ती माझ्या सिकंदरनेच मारली होती. परंतु केवळ फडातल्या पंचाने चुकीच्या पद्धतीने समोरच्या पैलवानाला पॉइंट दिल्याने वर्षभर कष्ट करून माझ्या लेकराच्या तोंडचा घास काढून घेतला. माझ्याच नाही तर कुणाच्याच पोरावर असा अन्याय होऊ नये”, अशी खंत सिकंदर यांचे वडील रशीद शेख यांनी व्यक्त केली.

आयुष्यभर कष्ट करून घरात पैलवान तयार केला होता. ऐन वेळेला फडात अशा पद्धतीने जर निर्णय होणार असतील तर पैलवान बनवण्यात काय अर्थ? अशी खंत व्यक्त करत सिकंदर शेखचे वडील रशीद शेख यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी सिकंदरच्या आई मुमताज शेख यांनाही अश्रू अनावर झाले.

सिकंदरला पराभूत करुन दाखवावं

सिकंदर शेखचे वस्ताद म्हणून काम करणारे शफी शेख यांनी आपला पठ्ठाच अव्वल असल्याचं सांगत. कुणीही महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील मल्लांनी त्याला हरवून दाखवावं, असं खुलं आव्हानच त्यांनी दिलं आहे.

हे वाचा >> Maharashtra Kesari: तो हरला, तरीही सोशल मीडियावर त्याचीच चर्चा; कोण आहे पैलवान सिकंदर शेख?

महाराष्ट्र केसरीचा वाद काय आहे?

माती गटातून सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम सामना खेळला गेला होता. या सामन्यातील विजेत्याची धडक थेट अंतिम सामन्यात शिवराज राक्षेसोबत मॅटवर होणार होती. सिंकदर शेख याने अनुभवी पैलवान बाला रफिक याला पराभूत करुन अंतिम सामन्यात धडक दिली होती. त्यामुळे सिंकदर शेखकडे महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात होते. या सामन्यात महेंद्र गायकवाड याने सिकंदरला बाहेरील टांग हा डाव टाकला होता. पण तो परिपूर्ण नव्हता, असं काहींचं म्हणणं आहे. सिकंदर धोकादायक पोजिशनला म्हणजे पाठीवर पडला नव्हता तरी महेंद्रला चार गुण कसे दिले गेले? असा प्रश्न विचारला जात आहे.

हे वाचा >> महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंचांना धमकी ; मुंबई पोलीस दलातील शिपायावर गुन्हा

महाराष्ट्र केसरीचा वाद आता पोलिस स्थानकात

हा सामना झाल्यानंतर आता कुस्तीचे पंच मारुती सातव यांना फोनवरुन धमकी दिल्याप्रकरणी पोलिस शिपाई संग्राम कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिकंदरला पाईंट का नाही दिला? असा जाब विचारून संग्राम कांबळे याने सातव यांना धमकावले, असा आरोप करण्यात येत आहे. या संभाषणाची कॉल रेकॉर्डिंगही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 12:49 IST
Next Story
Babar Azam Leaked Video: “बाबर आझमने मला प्रेग्नेंट केले अन्…”, महिलेने PCBकडे केली कडक कारवाईची मागणी