विश्वास पवार, लोकसत्ता

वाई: तब्बल ६१ वर्षांच्या कालखंडानंतर महाराष्ट्र केसरीचा फड साताऱ्याच्या छत्रपती शाहू क्रीडा संकुलामध्ये मंगळवार  ५ ते ९ एप्रिल या काळात रंगणार आहे. या तालमीमध्ये तब्बल ९०० मल्ल ४५ संघांमधून  झुंजणार आहेत. गादी आणि माती विभागातील वजन ५७ ते १२५ किलोच्या गटांमध्ये विजेत्यांना  ३३ लाख रुपयांचे मानधन दिले जाणार आहे.

या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याचा क्रीडा विभाग सातत्याने संकुलात तयारीमध्ये असून जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी तब्बल बारा विभागांमध्ये यजमानपदाची जबाबदारी जिल्हा तालीम संघ व महाराष्ट्र कुस्ती फेडरेशनच्या माध्यमातून उत्तमरीत्या सांभाळली आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने अधिवेशन  साताराला  घेण्याचे ठरल्यानंतर छत्रपती शाहू क्रीडा संकुलाला नवीन झळाळी मिळाली आहे. यामध्ये जिल्हा तालीम संघ आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने महाराष्ट्र केसरीच्या यजमानपदाची तयारी सध्या सुरू आहे. या तयारीचा आढावा पालक मंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार, निमंत्रक सुधीर पवार आणि दीपक पवार  घेत आहेत. ४५ संघांतून ११३६ मल्ल पाच आखाडय़ांमध्ये एकमेकांशी झुंजणार आहेत.

करोना महामारीमुळे दोन वर्षे कुस्ती स्पर्धा झाली नाही त्यामुळे यंदा सातारला होणाऱ्या स्पर्धेला कुस्तीशौकिनांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल अशी सध्या कुस्तीक्षेत्रात चर्चा सुरू आहे.

५ रोजी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत  होणार आहे. मात्र महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम आखाडा दिनांक ९ रोजी असून मानाची गदा कोण पटकावणार, याची खरी उत्सुकता आहे.

महाराष्ट्र केसरीच्या लढतीअगोदरच अनेक मल्ल दुखापतीमुळे जायबंदी झाल्याने जिल्हा निवड चाचणीत निवड होऊन देखील यंदा दिग्गज मल्लांना आखाडय़ाच्या बाहेर बसावे लागणार आहे. यामध्ये प्रामुख्याने गतवेळचा उपविजेता शैलेश शेळके, शिवराज राक्षे, सागर बिराजदार, माऊली जमदाडे, नीलेश लोखंडे, यांचा समावेश आहे.

पुणे शहरातून पृथ्वीराज मोहोळ आणि हर्षद कोकाटे नवखी जोडी मैदानात उतरली आहे. कुठलाही दबाव नसल्याने चांगल्या कामगिरीची पुणेकरांना त्यांच्या कडून अपेक्षा आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत दरवर्षी अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील मल्लांचे वर्चस्व राहिले आहे. यंदा देखील संकुलात सराव करणारे विविध जिल्ह्यातील ४२ मल्ल स्पर्धेत लढणार आहेत. महाराष्ट्र केसरी गटात गतविजेता हर्षवर्धन सदगीर, गणेश जगताप, महेंद्र गायकवाड, अतुल पाटील, कौतुक डाफळे, दादा शेळके लढणार आहेत.

सातारला दोन दशकापासून महाराष्ट्र केसरीच्या गदेने हुलकावणी दिली आहे. यंदा  सातारला गदा मिळवून देण्यासाठी किरण भगत माती गटातून उतरला आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर किरण भगतची ही पहिली स्पर्धा आहे.  दुसरीकडे गादी गटात नवख्या दिग्विजय जाधवर सातारा जिल्ह्याची मदार आहे.

सोलापूरमधून महेंद्र गायकवाड, रवी सरवदे, अक्षय मंगवडे आणि बाहेरच्या जिल्ह्यातून सिकंदर शेख, दत्ता नरळे, समाधान पाटील, बालारफिक शेख, संतोष दोरवड, दादा शेळके, गणेश जगताप खुल्या गटातून सोलापूरचे नेतृत्व करीत आहेत. दुखापतीतून सावरल्यानंतर मैदानी कुस्तीत विजयी घोडदौड चालू असलेला भारत मदने याने (मुंबई शहर) प्रतिस्पर्ध्यासमोर आव्हान उभे करण्याच्या इराद्याने स्पर्धेत उडी घेतली आहे.

मूळचे सोलापूरचे मात्र मुंबई शहराकडून महाराष्ट्र केसरीसाठी यंदा देखील अनुभवी समाधान पाटील, दत्ता नरळे नशीब अजमावणार आहेत. रत्नागिरीचा लढवय्या संतोष दोरवड दुखापतीतून बरा झाल्यावर माती गटातून लढणार आहे. अनुभवी असल्याने त्याच्या कामगिरीकडे सोलापूरच्या नजरा लागल्या आहेत. मैदानी कुस्तीत महाराष्ट्रासह उत्तर भारतातील दिग्गज मल्लांना पराभवाची धूळ चारणारा कुस्तीशौकिनांच्या गळय़ातील ताईत असलेला तगडा मल्ल सिंकदर शेख वाशीम जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. मैदानी कुस्तीत विजयी घोडदौड सुरू असलेला  सिकंदर गदा जिंकण्याच्या इराद्याने यंदा उतरला आहे. अक्षय मंगवडे, रवि सरवदे (सोलापूर) स्पर्धेत उतरले आहेत. बीडमधून अक्षय शिंदे घोडदौड मारण्याच्या तयारीनिशी आला आहे.