पुणे : यंदाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेमुळे राज्यातील कुस्ती क्षेत्र ढवळून निघणार असून, हर्षवर्धन सदगीर, पृथ्वीराज पाटील अशा माजी विजेत्यांसह विविध जिल्ह्यांतील मल्ल पूर्ण तयारीने या स्पर्धेत उतरले आहेत. त्यामुळे या वेळी कोणता मल्ल मानाची गदा पटकावणार हे सांगणे अवघड आहे. तुल्यबळ लढतींनी यंदाची राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा रंगणार असा अंदाज तज्ज्ञांच्या वतीने व्यक्त केला जात आहे.

मंगळवारपासून पुण्यातील कोथरुड येथे रंगणाऱ्या या स्पर्धेत नाशिकचा हर्षवर्धन सदगीर, कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील, बाला रफीक शेख या माजी विजेत्यांसमोर उदयोन्मुख मल्लांचे आव्हान राहणार आहे. पृथ्वीराज पाटीलने गेल्याच महिन्यात राष्ट्रीय विजेतेपदही मिळवल्यामुळे तो चांगल्या लयीत असेल, असे मानले जात आहे. या तिघांना सोलापूरचा सिंकदर शेख, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील किरण भगत, पुणे जिल्ह्याचा हर्षद कोकाटे यांचे आव्हान असेल. किरण हा यापूर्वीचा उपमहाराष्ट्र केसरी आहे. किरणला २०१७ मध्ये अभिजीत कटकेविरुद्ध किताबी लढतीत पराभव पत्करावा लागला होता.

eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
Pankaja munde and jyoti mete
बीडमध्ये तिहेरी लढत? पंकजा मुंडेंसमोर आता ज्योती मेटेंचंही आव्हान; मविआनं डावलल्यानंतर म्हणाल्या, “पुढची पावलं…”
In Satara opposition to Udayanaraje came from the Grand Alliance lok sabha election 2024
साताऱ्यात उदयनराजे यांना महायुतीतूनच विरोध
Senior Men National Kabaddi Tournament from today Maharashtra vs Gujarat Kabaddi match sport news
महाराष्ट्राची सलामी गुजरातशी; वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा आजपासून

अन्य मल्लांमध्ये खालकर तालमीत संभाजी आंग्रे आणि वडील राजेंद्र मोहोळ यांच्याकडे मार्गदर्शन घेणारा पृथ्वीराज मोहोळ हा पदार्पणाच्या स्पर्धेतच प्रभाव पाडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पूर्वीचे नामांकित मल्ल अमृता मोहोळ यांचा तो नातू आहे. लातूरचा शैलेश शेळके, विशाल बनकर, माऊली जमदाडे आणि मुंबईकडून खेळणारा आदर्श गुंड हे मल्लही आपली प्रतिभा दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

गदेची परंपरा कायम

किताब विजेत्या मल्लास चांदीची गदा देण्यात येते. ही प्रथा १९६१ पासून सुरू असली, तरी १९८२ पासून ही गदा राज्य कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ मोहोळ कुटुंबीयांच्या वतीने त्यांचे चिरंजीव माजी खासदार अशोक मोहोळ यांच्याकडून दिली जाते. यंदा स्पर्धेच्या मान्यतेवरून वाद सुरू असला, तरी स्पर्धा होत असल्याने आम्ही ती गदा परंपरेप्रमाणे देणार असे अशोक मोहोळ यांच्या वतीने सांगण्यात आले.

पंच उजळणी वर्ग संपन्न

या स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यांतून आलेल्या पंचांचा उजळणी वर्ग सोमवारी स्पर्धेच्या ठिकाणी पार पडला. आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड यांनी या पंचांना मार्गदर्शन केले.

सहभागी मल्ल पूर्ण तयारीने उतरले आहेत. प्रत्येकाकडेच चांगल्या कामगिरीची क्षमता आहे. आखाडय़ात आणि गादीवर होणाऱ्या लढतीदरम्यान कोण वरचढ ठरणार याचा अंदाज बांधणे कठीण आहे. स्पर्धा रंगतदार होईल. 

– योगेश दोडके, माजी हिंद केसरी विजेते