पुणे : रामकृष्ण सातव कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने आयोजित ६८व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत गादी विभगातून हर्षवर्धन सदगीर, तर माती विभागातून सिकंदर शेख या माजी विजेत्यांचे आव्हान कायम राहिले आहे. पृथ्वीराज मोहोळ, पृथ्वीराज पाटील आणि शिवराज राक्षे या अन्य तीन माजी विजेत्यांची घोडदौड बाद फेरीत संपुष्टात आली.
वाघोली येथे उभारलेल्या स्व. अजित पवार क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत गादी विभागात पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळचा पराभव सर्वात धक्कादायक ठरला. वजनदार असलेल्या पृथ्वीराजला सोलापूरच्या काटक शरीरयष्टी लाभलेल्या जय पाटीलने अवघ्या सव्वा मिनिटात चितपट करून सर्वात सनसनाटी निकाल नोंदवला. चपळ कुस्ती करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जयने लढत सुरू होताच पृथ्वीराजला स्थिरावण्याची संधीच दिली नाही. पृथ्वीराजचा आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न फसला आणि पायात अडकून खाली पडला. ही संधी जयने अचूक साधली. पृथ्वीराजवरील पकड घट्ट करत कुस्ती धोकादायक स्थितीत नेत त्याला चीतपट केले. गादी विभागातील अंतिम लढतीत त्याची गाठ आता नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरशी होईल. मध्यंतरापर्यंत संथ झालेल्या लढतीत हर्षवर्धनने उत्तरार्धात पृथ्वीराजचा एकेरी पट काढण्याचा डाव परतवून लावला आणि त्याच स्थितीत त्याच्यावर ताबा मिळवत गुण वाढवत ६-२ असा विजय मिळविला.
माती विभागातील उपांत्य फेरीत दोन्ही निकाल अपेक्षित लागले. बाहुबली म्हणून प्रसिद्ध असलेल्या महेंद्र गायकवाडने आपली ताकद दाखवून देत सोलापूरच्या रवीराज चव्हाणचा भारंदाज डावावर झटपट गुण वसूल करत पहिल्याच फेरीत १०-० अशा तांत्रिक आघाडीवर विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. तमाम कुस्ती शौकिनांचा लाडका असलेल्या सिकंदर शेखने नंतर अहिल्यानगरच्या सुदर्शन कोतकरचे आव्हान अगदी आरामात गुणांवर ४-३ असे परतवून लावले. नि्क्रिरय कुस्तीची ताकीद मिळाल्यावर तीस सेकंदाच्या कालावधीत अगदी अखेरच्या सेकंदाला सुदर्शनने गुण वसूल केला आणि पाठोपाठ ताबा मिळवत दोन गुणांची कमाई करून मध्यंतराला ३-० अशी आघाडी कायम राखली होती.
मात्र, उत्तरार्धात सुरुवातीला सिकंदर आक्रमक झाला. सुदर्शनने या वेळी बचाव भक्कम ठेवताना सिंकदरला पायाची पकड मिळवून दिली नाही. वेळ संपत असताना सिकंदर शांत होता. त्याने अत्यंत हुशारीने सुदर्शनला दमू दिले आणि नंतर प्रथम निष्क्रियतेचा आणि नंतर ताबा मिळवत दोन गुणांची कमाई करून कुस्ती ३-३ अशी बरोबरीत आणली. अखेरच्या मिनिटात सुदर्शनला स्टेप आऊट करत त्याने निर्णायक एक गुण मिळवून विजय मिळविला.
अशा होणार अंतिम लढती
’ गादी विभाग- जय पाटील वि. हर्षवर्धन सदगीर
’ माती विभाग – सिकंदर शेख वि. महेंद्र गायकवाड
(सिकंदर शेख आणि सुदर्शन कोतकर यांच्यातील माती विभागातील लढतीचा क्षण)
