टिटवाळा येथे रंगलेल्या चौथ्या सबज्युनियर राष्ट्रीय लंगडी स्पर्धेत महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात तामिळनाडूने महाराष्ट्राला नमवत जेतेपदावर कब्जा केला.
१४ वर्षांखालील मुलांमध्ये महाराष्ट्राचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. कॅडेट गटात अर्थात १० वर्षांखालील गटात महाराष्ट्राने दोन्ही गटांत कर्नाटकवर विजय मिळवत दुहेरी मुकुटावर नाव कोरले.
१४ वर्षांखालील मुलींच्या अंतिम लढतीत तामिळनाडूने महाराष्ट्राला ३२-३० असे नमवले. महाराष्ट्रातर्फे मानसी बावकरने १ मिनिटे संरक्षण करताना ४ गडी टिपले. भक्ती धांगडेने १.१० मिनिटे संरक्षण करताना ३ गडी बाद केले. सोनाली पावसकरने ४ गडी बाद केले.  १४ वर्षांखालील मुलांच्या गटात मात्र महाराष्ट्राला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. या गटाच्या अंतिम लढतीत मणिपूरने तामिळनाडूवर ३८-३३ अशी मात केली. मंजा सिंगने १ आणि ७ मिनिटे संरक्षण केले. नेपोलियन सिंगने १.१० मिनिटे संरक्षण करताना ५ गडी बाद केले.
१४ वर्षांखालील गटात महाराष्ट्राचा प्रेम भाबिंड उत्कृष्ट आक्रमकपटू ठरला, तर मुलींमध्ये सोनाली पावसकर उत्कृष्ट संरक्षक ठरली.
 १० वर्षांखालील मुलांमध्ये महेश पवार सवरेत्कृष्ट खेळाडू ठरला. मुलींमध्ये ईशा भोईर सवरेत्कृष्ट खेळाडू , तर वैष्णवी नाईक सवरेत्कृष्ट संरक्षक ठरली.