सांघिक व सातत्यपूर्ण कामगिरी हेच आमच्या संघाच्या यशाचे गमक असून, आता रणजी विजेतेपदासाठी कर्नाटकचे आव्हान स्वीकारण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत, असे महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांनी सांगितले.
महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यात रणजी विजेतेपदासाठी २९ जानेवारीपासून सामना सुरू होणार आहे. या सामन्यासाठी महाराष्ट्राने सोमवारी सरावही केला.
महाराष्ट्राने या स्पर्धेत २१ वर्षांनी अंतिम फेरी गाठली आहे. विजेतेपदाच्या संधीविषयी भावे म्हणाले, यंदा आमच्या खेळाडूंनी सर्वच आघाडय़ांवर सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. आम्ही उपांत्यपूर्व फेरीत मुंबईला वानखेडेवर, उपांत्य फेरीत पश्चिम बंगालविरुद्ध इडन गार्डन्सवर पराभूत केले आहे. त्यामुळे आमच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे. अर्थात अंतिम लढतीत कर्नाटकचे आव्हान मोठे आहे. त्यांना आम्ही कमी लेखत नाही. त्यांच्याकडेही अनुभवी फलंदाज व गोलंदाज आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत लढत देण्याची आमची तयारी आहे.
विजय झोलच्या समावेशाबाबत समाधान व्यक्त करीत भावे यांनी सांगितले, विजय हा अतिशय नैपुण्यवान खेळाडू आहे. त्याने रणजी पदार्पणातच अतिशय चमकदार खेळ केला आहे. कर्णधार रोहित मोटवानी, केदार जाधव, हर्षद खडीवाले, संग्राम अतितकर यांच्यासह सात फलंदाजांनी यंदा सरासरी पन्नासपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. जाधवने यंदाच्या मोसमात एक हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. खडीवाले यानेही जवळजवळ तेवढय़ाच धावा केल्या आहेत. परगावच्या मैदानांवरही आमच्या फलंदाजांनी शतके टोलविली आहेत. ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे.
गोलंदाजांच्या कामगिरीबाबत भावे म्हणाले, प्रत्येक गोलंदाजाने यंदा त्याच्यावर सोपविलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे. संघाला अंतिम फेरीत स्थान मिळविण्यात त्यांचाही महत्त्वाचा वाटा आहे. समाद फल्लाह, श्रीकांत मुंढे, अनुपम सकलेचा, अक्षय दरेकर यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. हा सामना हैदराबादसारख्या तटस्थ ठिकाणी होत आहे, त्याविषयी भावे म्हणाले, कोणतेही मैदान असो, आमच्या खेळाडूंना काहीही फरक पडत नाही. सामन्यात आपल्या क्षमतेच्या शंभर टक्के कामगिरी करण्याचाच प्रयत्न आमच्या खेळाडूंकडून केला जातो. त्यामुळेच आमच्या खेळाडूंना यंदा चांगले यश लाभले आहे.