बावणे व जाधवची शतके
अंकित बावणे व कर्णधार केदार जाधव यांच्या शैलीदार शतकांच्या जोरावर महाराष्ट्राने विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत आंध्र संघावर ४७ धावांनी विजय मिळविला. या स्पर्धेत महाराष्ट्राचा हा लागोपाठ तिसरा विजय आहे.
प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राची एक वेळ ४ बाद १७ अशी दयनीय स्थिती होती, मात्र जाधवने बावणे याच्या साथीत आत्मविश्वासाने खेळ केला. या दोन्ही खेळाडूंच्या शतकांमुळे महाराष्ट्रास ५० षटकांत ८ बाद २४१ अशी समाधानकारक धावसंख्या रचता आली. या आव्हानाला सामोरे जाताना आंध्र संघाने ३ बाद १११ अशी चांगली सुरुवात केली होती, मात्र त्यानंतर शामसुझामा काझी व अक्षय दरेकर यांच्या प्रभावी गोलंदाजीपुढे आंध्रचा डाव १९४ धावांमध्ये कोसळला. आंध्रच्या कोरीपल्ली श्रीकांतने झुंजार अर्धशतक पूर्ण करत एकाकी लढत दिली. महाराष्ट्राकडून शामसुझामा काझीने चार बळी मिळविले.
संघाची ही घसरगुंडी थोपविण्याची जबाबदारी बावणे व जाधव यांनी समर्थपणे पेलली. त्यांनी आंध्रच्या संमिश्र माऱ्यास खणखणीत उत्तर दिले. त्यांनी ३८.१ षटकांत १९४ धावांची भागीदारी केली व संघाला दोनशे धावांपलीकडे नेले. बावणेने १७९ मिनिटांत १०० धावा केल्या.
या मोसमातील त्याचे हे पहिलेच शतक आहे. जाधव याने या मोसमातील तिसरे शतक लगावताना १०१ धावा केल्या. त्यामध्ये त्याने ११ चौकार ठोकले. त्याने तीन झेल व एका फलंदाजास धावबाद करीत महत्त्वपूर्ण कामगिरी केली. आंध्रकडून डी. शिवकुमार व चिपुरापल्ली स्टीफन यांनी प्रत्येकी तीन बळी मिळविले. सलग तीन विजयांनंतर महाराष्ट्राचे १२ गुण झाले आहेत.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र ५० षटकांत ८ बाद २४१ (अंकित बावणे १००, केदार जाधव १०१, डी. शिवकुमार ३/२४, सी.स्टीफन ३/५४) वि.वि. आंध्र ४२.५ षटकांत सर्व बाद १९४ (श्रीकर भारत २८, कोरीपल्ली श्रीकांत ७४, ए. प्रदीप २८, अश्विन हेब्बर २४, शामसुझामा काझी ४/३६, अक्षय दरेकर २/३३)