Rohit Sharma Fitness Update: आयपीएल २०२६ स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध वनडे आणि कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तर वनडे क्रिकेटमध्ये तो अजूनही भारतीय संघाचा भाग आहे. अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. पण त्याच्या नावापुढे फुली आहे, याचा अर्थ असा की, रोहित खेळणार की नाही हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे. बीसीसीआयच्या मते, रोहित शर्मा अजूनही पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही. दरम्यान मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धनेने रोहितच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट दिली आहे.

रोहित शर्माने आयपीएल २०२६ स्पर्धेत दमदार सुरुवात केली होती. पण त्यानंतर त्याला ३ आठवडे दुखापतीमुळे मैदानाबाहेर राहावं लागलं होतं. त्यामुळे त्याला काही सामने खेळता आले नव्हते. त्यामुळे बीसीसीआयला अजूनही वाटतंय की, रोहित शर्मा पूर्णपणे फिट झालेला नाही. पण महेला जयवर्धनेने दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा १०० टक्के फिट आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२६ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. साखळी फेरीतील मुंबईचा शेवटचा सामना राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. या सामन्याआधी महेला जयवर्धनेने रोहितच्या फिटनेसबाबत अपडेट दिली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना महेला जयवर्धने म्हणाले, “आमच्या फिटनेस टीमने दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा १०० टक्के फिट आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरल्यानंतर आम्ही जरा काळजी घेत आहोत. टीम कॉम्बिनेशनमुळे त्याला आम्ही इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवतोय. त्याच्या फिटनेसबाबत कुठलीही शंका नाही.” यावरून हे तर स्पष्ट झालं आहे की, रोहित शर्मा पूर्णपणे फिट आहे. मग बीसीसीआयने त्याच्या नावासमोर स्टार का लावला? बीसीसीआयला रोहितच्या फिटनेसबाबत कुठलीही अपडेट मिळालेली नाही का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जाऊ लागले आहेत. अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या मालिकेत रोहित खेळणार का? की फिटनेसमुळे बाहेर बसणार? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.