scorecardresearch

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील Border-Gavaskar Trophy कोण जिंकणार? महेला जयवर्धनेने केली मोठी भविष्यवाणी

IND vs AUS Test Series: द आयसीसी रिव्ह्यूच्या ताज्या भागात, त्याने ही मालिका खूप मनोरंजक असेल असे भाकीत केले आहे. ही चार सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी ९ फेब्रुवारीपासून नागपूर कसोटीपासून सुरू होत आहे.

IND vs AUS Test Series Mahela Jayawardene predicts
महेला जयवर्धने (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी कसोटी मालिका ९ फेब्रुवारीपासून भारतात होणार आहे. या मालिकेत ४ सामन्यांचा समावेश आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपुरात होणार असून त्यासाठी दोन्ही संघांनी तयारी सुरू केली आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. मालिका अजून सुरूही झालेली नाही पण तज्ज्ञांकडून अंदाज वर्तवला जात आहे. श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू महेला जयवर्धनेने या मालिकेत कोण जिंकेल याबाबत भाकीत केले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नेहमीच कडवी झुंज होत आली आहे. ऑस्ट्रेलिया २००४ पासून भारतामध्ये टीम इंडियाला हरवू शकले नाही. तरीही महेला जयवर्धनेचा कांगारूंवर पूर्ण विश्वास आहे. द आयसीसी रिव्ह्यूच्या ताज्या भागात संजना गणेशनशी बोलताना जयवर्धने म्हणाला की, तो दोन्ही संघांमधील एका शानदार मालिकेची वाट पाहत आहे. मात्र, त्याच्या मते पाहुणा संघ २-१ ने मालिका जिंकेल. असे झाल्यास भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतून बाहेर पडेल.

ऑस्ट्रेलियन फलंदाज भारतीय परिस्थितीचा कसा सामना करतात –

श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू म्हणाला, ”मला वाटते की ही नेहमीप्रमाणेच चांगली मालिका असणार आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज भारतीय परिस्थितीचा कसा सामना करतात हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे, त्यांच्याकडे खरोखरच चांगली गोलंदाजी आहे आणि भारतीय फलंदाज त्याचा कसा सामना करतात हे पाहणे मनोरंजक असेल. याबद्दल भविष्यवाणी करणे कठीण आहे. परंतु श्रीलंकन असल्याने, मला आशा आहे की ऑस्ट्रेलिया पुढे आहे. कदाचित ऑस्ट्रेलिया २-१ ने जिंकू शकेल, परंतु ते कठीण होणार आहे.”

हेही वाचा – WI vs ZIM: तेजनारायण-शिवनारायण चंद्रपॉलने वेस्ट इंडिजसाठी रचला इतिहास; पिता-पुत्र जोडीने ‘या’ खास यादीत मिळवले स्थान

बॉर्डर-गावसकर मालिकेतील आकडेवारी –

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी अंतर्गत आतापर्यंत १५ मालिका आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी भारतात ८ आणि ऑस्ट्रेलियात ७ मालिका खेळल्या गेल्या आहेत. यापैकी भारताने ९ मालिका जिंकल्या आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने पाच मालिका जिंकल्या आहेत. एकमेव अनिर्णित मालिका २००३-०४ मध्ये खेळली गेली होती, जेव्हा भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. या ट्रॉफी अंतर्गत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ५२ कसोटींपैकी भारताने २२ आणि ऑस्ट्रेलियाने १९ जिंकले आहेत, तर ११ सामने अनिर्णित राहिले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 12:11 IST