वृत्तसंस्था, मुंबई

श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने याने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स संघाचे प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या व्यवस्थापनाने याबाबत अधिकृत घोषणा शनिवारी केली.

जयवर्धनेने २०१७ ते २०२२ या पहिल्या कार्यकाळात मुंबई इंडियन्सला तीन वेळा (२०१७, २०१९, २०२०) विजेतेपदे मिळवून दिले. त्यानंतर २०२२ ते २०२४ या काळात त्याने ‘एमआय’ फ्रँचायझीच्या जागतिक कामगिरी विभागाचा प्रमुख म्हणून काम पाहिले. २०२५ मध्ये मार्क बाऊचरच्या जागी जयवर्धनेची पुन्हा मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, त्याचा दुसरा कार्यकाळ फारसा यशस्वी ठरला नाही. २०२५च्या हंगामात मुंबईने चौथे स्थान मिळवले, तर २०२६ मध्ये संघाची कामगिरी अधिकच खालावली. १० संघांच्या या स्पर्धेत मुंबईचा संघ नवव्या स्थानावर राहिला. त्यामुळे जयवर्धनेच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर त्याने स्वत:च प्रशिक्षकपदापासून दूर होण्याचा निर्णय घेतला.

मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांनी जयवर्धनेच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.  ‘‘महेलाने अनेक वर्षे मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याचे नेतृत्व, सचोटी आणि खेळावरील प्रेम आमच्यासाठी विशेष ठरले. त्याने दाखवलेल्या बांधिलकीबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत. तो नेहमीच आमच्या परिवाराचा भाग राहील,’’ असे नीता अंबानी यांनी निवेदनात म्हटले.

नवी नियुक्ती लवकरच?

आगामी ‘आयपीएल’ हंगामासाठी खेळाडू कायम ठेवण्याची (रिटेन्शन) अंतिम मुदत १५ नोव्हेंबर आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनासाठी पुढील काही आठवडे महत्त्वाचे ठरणार आहेत. डिसेंबरच्या मध्यात गोव्यात खेळाडूंचा लिलाव होण्याची शक्यता आहे. त्याआधी प्रशिक्षकपदाची नियुक्ती, संघाची पुनर्बांधणी आणि आगामी हंगामाचे नियोजन यावर मुंबई इंडियन्सचा भर असेल असे समजते.