महेला जयवर्धनेची द्विशतकी खेळी आणि किथरुवान विथांगेच्या पहिल्यावहिल्या कसोटी शतकाच्या जोरावर श्रीलंकेने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ७३० धावांचा डोंगर उभारला. ५ बाद ३७५वरून पुढे खेळणाऱ्या श्रीलंकेची धावसंख्या दोन मोठय़ा भागीदाऱ्यांमुळे वाढली. जयवर्धनने अँजेलो मॅथ्यूजच्या साथीने सहाव्या विकेटसाठी १७९ धावांची भागीदारी केली. मॅथ्यूज ८६ धावांवर बाद झाला. त्यानंतर जयवर्धने-विथांगे जोडीने सातव्या विकेटसाठी १७६ धावांची अभेद्य भागीदारी केली. नासिर हुसेनच्या गोलंदाजीवर षटकार खेचत जयवर्धनेने सातव्या द्विशतकाची नोंद केली. विथांगेने १२ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद १०२ धावा केल्या. श्रीलंकेला ४९८ धावांची दमदार आघाडी मिळाली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा बांगलादेशची दुसऱ्या डावात १ बाद ३५ अशी अवस्था झाली असून, ते अजूनही ४६३ धावांनी पिछाडीवर आहेत.