Maharashtra Kesari Mahendra Gaikwad Gesture Win Hearts Video: पुण्यातील वाघोळी येथे प्रतिष्ठित ६८ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी हर्षवर्धन सदगीर ठरला. महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात झालेल्या अंतिम लढतीतल हर्षवर्धनने ४-३ अशा फरकाने विजय मिळवला. या विजयासह हर्षवर्धनने सदगीर डबल महाराष्ट्र केसरी ठरला खरा पण त्यानंतर त्याने मॅटवरील कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. पण यादरम्यान सिकंदर शेख व महेंद्र गायकवाड यांच्यातील कुस्तीचा व्हीडिओ सध्या चर्चेत आहे.

हर्षवर्धन सदगीर ठरला चांदीच्या गदेचा मानकरी

हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड यांच्यात तगडी स्पर्धा अपेक्षित होती. लढतीला अपेक्षित आक्रमक सुरुवात झाली होती. महेंद्रने सुरुवातीलाच हर्षवर्धनला संरक्षक क्षेत्रात नेत एका गुणाची वसूली केली होती. लढतीदरम्यान महेंद्र सातत्याने हर्षवर्धनच्या चेहऱ्यावर हात मारत होता. यामुळे पूर्वार्धात याचा दंड म्हणून प्रतिस्पर्धी हर्षवर्धनला एक गुण देण्यात आला होता. मध्यंतराला १-१ अशी लढत बरोबरीत राहिली होती. त्यानंतर उत्तरार्धात निष्क्रय कुस्तीत अपयशी ठरल्याने हर्षवर्धनला दुसऱ्यांदा आयता गुण मिळाला. संधी मिळताच हर्षवर्धनने महेंद्रवर ताबा घेत दोन गुणांची कमाई करत ४-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर महेंद्रने दोनवेळा हर्षवर्धनला संरक्षक क्षेत्रातून बाहेर नेत दोन गुणांची संपली होती. कमाई केली. पण, तोवर वेळ संपली आणि हर्षवर्धन सदगीर विजेता ठरला.

तत्पूर्वी बाहुबली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्र गायकवाडच्या कृतीमुळे सर्वांची मनं जिंकली. महेंद्र गायकवाडने माती विभागातील अंतिम लढतीत सर्वाधिक लोकप्रिय असलेला आणि किताबासाठी पहिली पसंती असलेल्या सिकंदर शेखचा ३-० असा एकतर्फी पराभव केला. या प्रतिष्ठित लढतीत सिकंदर शेखचा पराभव करत महेंद्र गायकवाडने किताबी लढतीसाठी पात्रता मिळावली. पहिल्या फेरीपासूनच महेंद्रने नेहमीप्रमाणे आक्रमक सुरूवात केली आणि पहिल्या मिनिटात एक गुण मिळवला. त्यानंतर पकड मिळवत त्याने दोन गुणांची कमाई केली. दुसऱ्या फेरीत सिकंदरने आक्रमक पवित्रा घेतला, पण गुण काही खात्यात भरू शकला नाही.

अखेरीस महेंद्र गायकवाडला वेळ संपल्यानंतर विजेता घोषित करण्यात आलं. यानंतर पंचांनी महेंद्रचा हात वर करत त्याला विजेता घोषित केलं. पण महेंद्रने यानंतर आखाड्यातच सिकंदर शेखच्या पायाला हात लावत आदर व्यक्त केला. महेंद्रच्या या खिलाडूवृत्तीने साऱ्यांची मनं जिंकली सिकंदर शेखने आपल्या मेहनतीच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली. त्याने २०१८ मधील अंडर-२३ कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं. सिकंदर हा कोल्हापूरातील गंगावेश तालमीचा पठ्ठ्या आहे. याशिवाय २०२४ मध्ये सिकंदरने रूस्तम-ए-हिंदचा किताब जिंकला होता.