महेंद्र सिंह धोनीच्या नावाचा वापर करुन जाहिरात केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने मॅक्स मोबाइल कंपनीचे कान उपटले आहेत. महेंद्र सिंह धोनी आणि मॅक्स मोबिलिंक कंपनीमध्ये असलेला करार २०१२ मध्ये संपला होता. तरीदेखील मॅक्स कंपनीने महेंद्र सिंह धोनी याच्या नावाचा वापर केला. यामुळे उच्च न्यायालयाने मॅक्स मोबिलिंकच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा तुम्ही मान का राखत नाही असा सवाल न्यायालयाने मॅक्स कंपनीला विचारला. कंपनीचे अध्यक्ष अजय अग्रवाल यांच्याविरोधात धोनीने तक्रार दाखल केली होती. माझ्या नावाचा अद्यापही वापर केला जात आहे असे धोनीने सांगितले. निर्णयाचा निकाल लागेपर्यंत धोनीचे नाव वापरुन उत्पादने विकू नका असे न्यायलयाने म्हटले.

याबरोबरच धोनीच्या ज्या जाहिरातींवर असलेले फोटो आणि नाव काढून टाका असे न्यायालयाने म्हटले आहे. धोनीचे वकील सुचिंतो चॅटर्जी यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली होते. तर, मॅक्स मोबाइल कंपनीचे वकील संजीव भंडारी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.  मॅक्स आणि धोनीमध्ये करार झाला होता. हा करार २०१२ मध्ये संपला होता. त्यानंतर पुन्हा या कराराचे नूतनीकरण झाले नाही. हा करार संपलेला असून तुम्ही धोनीचे नाव सध्या वापरू नका असे न्यायालयाने म्हटले आहे.  मॅक्स कंपनीने कोट्यवधी रुपयांचा करार केला होता. २०१४ मध्ये धोनीने न्यायालयाकडे तक्रार केली होती. धोनीच्या नावाचा वापर करुन कंपनी अद्याप उत्पादन विकत आहे. परंतु  महेंद्र सिंह धोनीला मानधनाबाबत काहीच विचारणा झाली नाही असे धोनींच्या वकीलाने म्हटले. महेंद्र सिंह धोनी हा मॅक्सच्या एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी उपस्थित राहणार होता, परंतु धोनी काही शुटिंगच्या वेळी उपस्थित राहिला नाही. त्यामुळे त्याच्याशी असलेल्या कराराचे नूतनीकरण केले नाही, असा युक्तीवाद भंडारी यांनी केला.  तर, धोनीचे वकील सुचिंतो यांनी म्हटले की कंपनी ही धोनीला ७० कोटी रुपये देणार होती. परंतु त्यांनी हे पैसे दिले नाहीत. फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर देखील धोनीचे नाव वापरुन कंपनीने जाहिरात केली. तेव्हा या ठिकाणाहून धोनीचे नाव काढून टाकण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात असे न्यायालयाने विचारले.