मुंबई : भारताला २०११मध्ये विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या भवितव्याबाबत बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरू आहेत. मात्र धोनीने अद्याप आपली निवृत्ती जाहीर केलेली नाही. मात्र कारकीर्दीतील चौथी विश्वचषक स्पर्धा खेळणाऱ्या धोनीने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे निवृत्तीच्या चर्चेला उधाण आले आहे. भारतीय संघ सध्या स्थित्यंतरातून जात असल्यामुळे धोनीने संघ उभारणीत मदत करावी, अशी भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील काही पदाधिकाऱ्यांची धारणा आहे.

‘‘धोनी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार नाही. त्याचबरोबर मायदेशात किंवा परदेशात भारतीय संघाचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक म्हणून त्याला पसंती दिली जाणार नाही. ऋषभ पंत त्याची जागा घेणार असला तरी तो संघात स्थिरावेपर्यंत त्याला मदत करावी. धोनी यापुढे भारताच्या १५ संघाचा भाग असेल, मात्र त्याला अंतिम ११ जणांमध्ये संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. विविध आघाडय़ांवर संघाला त्याच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. धोनीही संघाला मदत करेल, अशी आशा आहे,’’ असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

‘‘धोनीने निवृत्तीबाबत कोणतेही संकेत दिले नाहीत. त्याने आपल्यातील गुणवत्ता, क्षमता वेळोवेळी सिद्ध केली आहे. धोनीची निवृत्ती अटळ असली तरी त्याने घाई करू नये,’’ असेही एका पदाधिकाऱ्याने सांगितले. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड समितीची मुंबईत शुक्रवारी बैठक होणार आहे. अनुभवी दिनेश कार्तिकऐवजी पंतला संधी मिळण्याची शक्यता आहे. ‘‘पंत पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेआधी २३ वर्षांचा होईल. त्याच्यात अफाट गुणवत्ता आहे, हे त्याने दाखवून दिले आहे. त्यामुळे एका वर्षांच्या कालावधीत पंतला पुरेसा अनुभव मिळू शकतो,’’ असेही त्यांनी सांगितले.

इंडियन प्रीमियर लीगमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाने २०१८मध्ये धोनीशी तीन वर्षांचा नव्याने करार केला आहे. याच करारानुसार खेळाडूंना संघात कायम राखले जाणार आहे. ‘‘धोनी अशाप्रकारे निवृत्त होऊ शकत नाही. चेन्नई संघाची भिस्त त्याच्यावर असून तोच संघाचा मुख्य कणा आहे. चेन्नई संघातही स्थित्यंतर होत असल्यामुळे संघाला त्याची गरज आहे,’’ असे आयपीएलमधील सूत्रांनी सांगितले.

निवृत्तीची फक्त अफवाच

महेंद्रसिंह धोनीने बुधवारी एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, अशी चर्चा बुधवारी रंगली होती. काही प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिल्यामुळे खरंच धोनी निवृत्त झाला की काय, अशी चर्चा चाहत्यांमध्ये होती. मात्र ही अफवा असल्याचे जाहीर झाल्यानंतर या प्रसारमाध्यमांनी आपले वृत्त मागे घेतले. विश्वचषकातील उपांत्य सामन्यात भारताचा पराभव झाल्यापासून धोनीच्या निवृत्ती विषयीच्या चर्चाना उधाण आले आहे.