रोहित शर्मा रविवारी शेवटची वनडे खेळणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. वनडे क्रिकेटमधल्या सार्वकालीन महान खेळाडूंमध्ये रोहितची गणना होते. वनडे क्रिकेटची लोकप्रियता जिवंत राखण्यात सिंहाची भूमिका बजावणाऱ्या रोहितची या प्रकारातली सुरुवात मात्र अडखळत झाली होती. २००७ ते २०१३ रोहित विविध क्रमांकावर खेळला. २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रोहितला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय किती योग्य आणि क्रांतिकारी होता याची साक्ष रोहितचे सलामीवीर म्हणून आकडे देतात.

‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या कार्यक्रमात गौरव कपूरशी बोलताना रोहितने वनडे सलामीवीर कसा झालो याची गोष्ट सांगितली होती. रोहितने सांगितलं, ‘सराव सामन्यातही सलामीला आलो नव्हतो. मी खूप दडपणाखाली होतो. मी कधीच सलामीला आलो नव्हतो. भारतात एखाद कधीतरी सलामीला आलो असेन पण आंतरराष्ट्रीय पातळीवर कधीच नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी मोठी स्पर्धा आहे. त्याला मिनी वर्ल्डकप म्हटलं जातं. पहिल्या सामन्यापूर्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मला सांगितलं की तू सलामीला जा. मी हो म्हटलं. त्याने सलामीला जा म्हटलं, मी होकारही दिला. खोलीत जाऊन विचार करू लागलो की हो तर म्हणालोय. हे मी योग्य केलं का’?

‘मला प्रतिस्पर्धी संघाविषयी काहीच माहिती नव्हतं. कोणाविरुद्ध सामना आहे हेही धड ठाऊक नव्हतं. खेळाडूला समजतं की तो अंतिम अकरात असणार आहे की नाही. मानसिकदृष्ट्या तुम्हाला ते समजतं. मी संघात नसेन असं मला वाटलेलं त्यामुळे मी काय करेन असा विचार करत होतो. सराव करेन, अमुक फटक्यावर काम करेन असं सगळं ठरवत होतो. कोणाविरुद्ध सामना होतोय याने मला फरक पडत नव्हता कारण मी खेळणार नव्हतो. पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे हेही मला ठाऊक नव्हतं. रात्री महेंद्रसिंग धोनीने सलामीला जाण्याविषयी सांगितलं. दडपण तर होतंच’, असं रोहित म्हणाला.

सलामीला उतरल्यानंतर रोहितने शिखर धवनला विचारलं स्ट्राईक कोण घेतं. शिखरने सांगितलं, ‘मी स्ट्राईक घेत नाही, तू घे. मी त्याला म्हटलं, मी सलामीवीराच्या भूमिकेत पहिल्यांदाच खेळतोय. या नंबरवर खेळण्याचा माझ्याकडे कोणताच अनुभव नाहीये’. रोहितने तेव्हाची मनोवृत्ती सांगितली. ‘मी विचार केला, जास्तीतजास्त काय होईल- आऊट होईन. बघूया काय होतंय. शिखरबरोबर पहिल्यांदा सलामी करताना आम्ही शंभरपल्याड भागीदारी केली. आम्ही ३३० धावा केल्या. आम्ही सामना जिंकलो. त्या स्पर्धेत आम्ही एकही सामना हरलो नाही, सराव सामनाही नाही. सगळं जिंकत गेलो’.

धोनीच्या त्या निर्णयाने रोहित शर्माचं आयुष्यच बदलून गेलं. पदार्पणापासून म्हणजे २००७ पासून २०१३ पर्यंत रोहित वनडे संघाचा भाग होता. काही वेळा संघाच्या आतबाहेरही झाला. तो ४-५-६-७ यापैकी कुठल्यातरी क्रमांकावर खेळत असे. त्याची संघातली भूमिका मधल्या फळीतला फलंदाज आहे का फिनिशर आहे हेच स्पष्ट होत नसे. याचा त्याच्या कामगिरीवरही परिणाम झाला. २०१३ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी महेंद्रसिंग धोनीने रोहितला सलामीला जाण्यास सांगितलं. त्याने होकार दिला आणि सगळं चित्रच बदललं.

रोहितच्या वनडे कारकिर्दीची सलामीवीर आणि अन्य क्रमांकावर फलंदाजी अशी विभागणी होते. सलामीला येणाऱ्या फलंदाजाला नवीन चेंडूचा सामना करावा लागतो. गोलंदाज ताजेतवाने असतात. खेळपट्टीचा नूर ओळखून फलंदाजी करावी लागते. रोहितने ही सगळी आव्हानं लीलया पेलली. ख्रिस गेल किंवा शाहिद आफ्रिदी यांच्याप्रमाणे चेंडूच्या ठिकऱ्या उडवत त्याने फलंदाजी केली नाही. रोहितने पूलच्या फटक्याला नवी ओळख मिळवून दिली. बाकी फलंदाजांच्या तुलनेत काहीसा उशिराने चेंडूला खेळण्याची पद्धत रोहितला वेगळं ठरवते.

उसळता चेंडू अंगावर घेऊन त्याला मैदानाबाहेर भिरकावून देण्याचं रोहितचं तंत्र अफलातून असंच होतं. कव्हर ड्राईव्ह असो किंवा स्ट्रेट ड्राईव्ह किंवा इनसाईड आऊट- रोहितची फटकेबाजी म्हणजे ठेवणीतल्या फटक्यांची बावनकशी मैफल असे. गवताला कापरं भरवत जाणारे त्याचे फटके चाहत्यांच्या मनात कोरलेले आहेत. सनथ जयसूर्या-रोमेश कालुवितरना, मॅथ्यू हेडन-अॅडम गिलख्रिस्ट, सचिन तेंडुलकर-सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर-वीरेंद्र सेहवाग या जोड्यांप्रमाणे रोहित शर्मा-शिखर धवन जोडी बिनीचे शिलेदार झाली. एकमेकांचे घट्ट मित्र असणाऱ्या या दोघांनी एकमेकांच्या खेळाचा आनंद लुटत खणखणीत भागीदाऱ्या केल्या.

बाकी क्रमांकावर खेळताना चाचपडणाऱ्या आणि रिदमसाठी आसुसलेल्या रोहितने सलामीच्या जबाबदारीला सर्वार्थाने न्याय दिला. गोलंदाजावर आक्रमण करत वर्चस्व गाजवण्याची पद्धत त्याने घालून दिली. तोच कित्ता भारताचे बाकी सलामीवीर गिरवत आहेत. ‘मी खेळपट्टीचा अंदाज घेतो आणि नंतर फटकेबाजीला सुरुवात करतो. तिशी ओलांडल्यानंतर मोठी खेळी करण्याचा माझा प्रयत्न असतो. एकदा सेट झाल्यानंतर मी चूक केली तरच आऊट होऊ शकतो. गोलंदाजांला मला बाद करणं कठीण असतं’, असं रोहितने याच कार्यक्रमात बोलताना सांगितलं होतं.

सलामीवीर म्हणून खेळताना रोहितने १८६ सामन्यात ५४.५५च्या सरासरीने ९२१९ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईकरेट ९६चा आहे. यामध्ये ३० शतकं आणि ४६ अर्धशतकांचा समावेश आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासात सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्यांच्या यादीत रोहित दुसऱ्या स्थानी आहे. बाकी क्रमांकावर खेळताना सरासरी तिशीत राहिलेल्या रोहितने सलामीवीर होताच नव्या उमेदीने खेळायला सुरुवात केली. वनडे क्रिकेटमधल्या सार्वकालीन महान सलामीवीरांमध्ये रोहितचं नाव घेतलं जातं. सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या, ख्रिस गेल, अॅडम गिलख्रिस्ट, सौरव गांगुली, डेसमंड हेन्स या दिग्गजांच्या मांदियाळीत रोहितने अथक मेहनतीच्या जोरावर स्थान पटकावलं.

वनडे क्रिकेटमधला अशक्य म्हणावा असा विक्रम रोहितच्या नावावर आहे. वनडे क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर तीन द्विशतकं आहेत. वनडे क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रमही रोहितच्याच नावावर आहे. एक शतक झळकावणं अवघड असताना रोहितच्या नावावर तब्बल तीन द्विशतकी खेळी आहेत.

दरम्यान रविवारी लॉर्ड्स इथे होणारा सामना रोहितचा भारतासाठीचा शेवटचा सामना नसेल असं बीसीसीआयचे सचिव देवजीत साइकिया यांनी स्पष्ट केलं आहे. भारतीय संघ या मालिकेनंतर झिम्बाब्वे इथे टी२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर एशियन गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्यासाठी प्रयत्नशील असेल. हे सामने टी२० प्रकारातील असतील. यानंतर वेस्ट इंडिजचा संघ भारतात येणार आहे. त्यावेळी म्हणजे सप्टेंबर महिन्यात वनडे मालिका होणार आहे. पुढच्या वर्षी दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे इथे वनडे वर्ल्डकप होणार आहे. २०२३ मध्ये रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ वनडे वर्ल्डकप जिंकण्याच्या उंबरठ्यावर होता. मात्र फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला नमवत जेतेपदावर नाव कोरलं. तो सल रोहितच्या आजही मनात आहे. रोहित आता कर्णधारपदाच्या भूमिकेत नसला तरी भारताला वनडे वर्ल्डकप जिंकून देण्याचं त्याचं ध्येय आहे.