‘‘अनुभवी महेश भूपती यंदाच्या हंगामानंतर निवृत्त होणार आहे. सध्याच्या भारताच्या डेव्हिस चषक लढतीचा तो भाग नसला तरी कारकिर्दीतील शेवटची डेव्हिस चषक लढत खेळण्याची संधी त्याला मिळायला हवी,’’ असे मत डेव्हिस चषक संघाचे कर्णधार आनंद अमृतराज यांनी व्यक्त केले. मात्र संघातील भूपतीच्या समावेशाचा निर्णय आपल्या हातात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, चायनीज तैपेईविरुद्धच्या डेव्हिस चषक लढतीसाठीच्या भारतीय संघात भूपतीचा समावेश नाही. रोहन बोपण्णा हा एकमेव दुहेरी विशेषज्ञ खेळाडू या संघात आहे.
प्रथमच भारताच्या डेव्हिस चषक संघाचे न खेळता नेतृत्व करणाऱ्या आनंद अमृतराज यांची भूमिका थोडी वेगळी आहे. ‘‘डेव्हिस चषकात खेळताना भूपतीने अतुलनीय योगदान दिले आहे. त्यामुळे कारकिर्दीतील शेवटची डेव्हिस चषक लढत खेळण्याची संधी मिळायला हवी. मात्र त्याच वेळी भूपतीला संघात घ्यायचे की नाही, हा निर्णय माझा नाही. वैयक्तिकदृष्टय़ा भूपतीने संघात असावे. निवड समिती याबाबत अंतिम निर्णय घेतील,’’ असे अमृतराज यांनी सांगितले.