पीटीआय, क्वालालंपूर : भारताच्या एच. एस. प्रणॉयने रविवारी तीन गेमपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात चीनच्या वेंग हाँग येंगला पराभूत करत मलेशिया मास्टर्स (सुपर ३०० दर्जा) बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. प्रणॉयला तब्बल सहा वर्षांच्या कालावधीनंतर एखादी स्पर्धा जिंकण्यात यश आले. प्रणॉयचे ‘बीडब्ल्यूएफ’ जागतिक मालिकेतील स्पर्धेचे हे पहिले जेतेपद ठरले.
३० वर्षीय प्रणॉयने ९४ मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात चीनच्या जागतिक क्रमवारीत ३४व्या स्थानी असणाऱ्या वेंगवर २१-१९, १३-२१, २१-१८ असा विजय मिळवला. प्रणॉयने गेल्या वर्षी थॉमस चषकात भारताच्या ऐतिहासिक यशात निर्णायक भूमिका बजावली होती. मात्र, २०१७च्या अमेरिकन खुल्या ग्रां. प्री. गोल्ड स्पर्धेनंतर त्याने कुठलेही जेतेपद मिळवले नव्हते. केरळचा हा खेळाडू गेल्या वर्षी स्विस खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. मात्र, त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. याशिवाय प्रणॉयने मलेशिया आणि इंडोनेशिया (सुपर १००० दर्जा) स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती; परंतु तो जेतेपदापासून दूरच राहिला. मलेशिया मास्टर्स स्पर्धेत मात्र त्याने जेतेपद पटकावले.




प्रणॉयला काही वर्षांपूर्वी दुखापतींचा सामना करावा लागला होता. मात्र, २०२१च्या मध्यानंतर त्याची कारकीर्द पुन्हा बहरली आहे. गेल्या दोन वर्षांत भारतीय खेळाडूंमध्ये प्रणॉयच्याच कामगिरीत सातत्य आहे. असे असूनही त्याला ‘बीडब्ल्यूएफ’ जागतिक मालिकेत जेतेपद मिळवता आले नव्हते. रविवारी जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या प्रणॉयने चीनच्या २३ वर्षीय वेंगला नमवत विजेतेपद पटकावले. प्रणॉयने स्पर्धेच्या जेतेपदाच्या प्रवासात जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या चाउ टिएन चेन, ऑल इंग्लंड विजेता ली शी फेंग आणि जपानच्या केंटा निशिमोटोला नमवले होते.
वेंगने सामन्याची चांगली सुरुवात करताना पहिल्या गेममध्ये ३-१ अशी आघाडी मिळवली होती. प्रणॉयने नंतर ५-५ अशी बरोबरी साधली. मग त्याने ११-१० अशी आघाडीही मिळवली. दोन्ही खेळाडूंमध्ये प्रत्येक गुणासाठी चुरस पाहायला मिळाली. दरम्यान, गेम १६-१६ असा बरोबरीत होता. यानंतर प्रणॉयने गुणांची कमाई करत गेम आपल्या नावे केला. दुसऱ्या गेममध्येही वेंगने प्रणॉयने केलेल्या चुकांचा फायदा घेत ४-० अशी आघाडी घेतली. प्रणॉयने पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, वेंगने गेमच्या मध्यंतरापर्यंत ११-९ अशी आघाडी मिळवली. वेंगने पुढेही चांगला खेळ सुरू ठेवत गेम जिंकला व सामना १-१ असा बरोबरीत आणला.
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये प्रणॉयने मध्यंतरापर्यंत ११-१० अशी आघाडी मिळवली. प्रणॉयने काही चांगले क्रॉस कोर्ट फटके मारत आघाडी १६-१३ अशी वाढवली. वेंगने पुन्हा खेळ उंचावत गेम १८-१८ असा बरोबरीत आणला. प्रणॉयने सलग दोन स्मॅश मारत दोन चॅम्पियनशिप गुण मिळवले. यानंतर वेंगचा फटका कोर्टबाहेर गेल्याने प्रणॉयला गुण मिळाला आणि त्याचे जेतेपद निश्चित झाले.
गेल्या सहा वर्षांत मी अनेक चढ-उतार पाहिले. सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मला जेतेपद मिळवता येईल याची मी कल्पनाही केली नव्हती. जेतेपद मिळवल्याचा खूप आनंद आहे. सर्व प्रशिक्षकांचे मनापासून आभार. गोपीचंद सरांचे विशेष आभार. त्यांनी मला चांगल्या कामगिरीसाठी सदैव प्रोत्साहन दिले. गेले चार महिने मी कठोर परिश्रम घेतले आहेत. अखेर त्याचे फळ मला मिळाले. चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात विजय मिळवल्याने एक खेळाडू म्हणून आत्मविश्वास दुणावतो. तुमच्या खेळातील अनेक सकारात्मक बाजू समोर येतात. मलेशियामध्येही असेच काही घडले.