क्वॉलालंपूर : गेल्या स्पर्धेतील निराशाजनक कामगिरी मागे सारत भारताच्या पीव्ही सिंधूचा मंगळवारपासून सुरू होणाऱ्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत (सुपर ७५० दर्जा) दर्जेदार खेळाचा प्रयत्न असेल. या स्पर्धेत तिच्यासह एचएस प्रणॉयवर भारताची मदार आहे.

 सिंधूला दोन आठवडय़ापूर्वी झालेल्या इंडोनेशिया स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत चीनच्या ही बिंग जियाओकडून पराभव पत्करावा लागला होता. आता कामगिरीत सुधारणेचा मानस असलेली सिंधू थायलंडच्या पोर्नवापी चोचुवांगविरुद्ध मलेशिया स्पर्धेतील मोहिमेला सुरुवात करेल.  तसेच सायना नेहवाल पहिल्या फेरीत अमेरिकेच्या इरिस वांगशी सामना खेळेल. हा सामना जिंकल्यास तिची गाठ जपानच्या सहाव्या मानांकित नोझोमी ओकुहाराशी पडू शकते.

पुरुषांमध्ये  प्रणॉयची मलेशियाच्या डॅरेन लिवशी गाठ पडणार आहे. बी. साईप्रणीतचा इंडोनेशियाच्या अँथनी िगटिंगशी सामना होईल, तर समीर वर्माची लढत जॉनटन ख्रिस्टिशी होईल. पुरुष दुहेरीत सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा मलेशियाच्या मान वेइ चोंग आणि काइ वुन टी जोडीशी सामना होणार आहे. अश्विनी पोनप्पा आणि बी. सुमीत रेड्डी ही जोडी मिश्र दुहेरीत नेदरलँड्सच्या रॉबिन टॅबेलिंग आणि सेलेना पिकशी दोन हात करेल.