वृत्तसंस्था, क्वालालम्पूर
भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील (सुपर १००० दर्जा) आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. चीनच्या वँग झियी हिने सिंधूचा २१-१६, २१-१५ असा सहज पराभव केला.
दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती सिंधू शनिवारी झालेल्या लढतीत वँगचा प्रतिकारच करू शकली नाही. अनावश्यक चुकांच्या मालिकेमुळे सिंधूला सरळ दोन गेममध्ये पराभवाचा सामना करावा लागला.
गेल्या वर्षी ऑक्टोबरला झालेल्या पायाच्या दुखापतीनंतर कोर्टपासून दूर राहिलेली सिंधू नव्या हंगामात विश्वासाने स्पर्धेत उतरली होती. मात्र, उपांत्य फेरीत ती दडपणाचा सामना करू शकली नाही. पहिला गेम गमाविल्यानंतरही दुसऱ्या गेमच्या मध्याला सिंधूने ११-६ अशी आघाडी मिळवली होती, परंतु ही आघाडी तिला टिकवता आली नाही. गेमच्या उत्तरार्धात ती केवळ चारच गुण मिळवू शकली.
सिंधूने पहिल्या गेममध्ये वँगला सुरुवातीला चांगले झुंजवले. वैशिष्ट्यपूर्ण क्रॉस कोर्ट स्मॅशने सिंधूने ५-२ अशी आघाडीही मिळवली. वँगने सलग गुणांसह बरोबरी साधली. अर्थात वँगकडून झालेल्या चुकांमुळे सिंधूने पुन्हा ९-७ अशी आघाडी मिळवली. वँगने प्रतिहल्ला करत गेमच्या मध्याला १२-११ अशी आघाडी घेतली. गेममधील १३-१३ अशा बरोबरीनंतर वँगने १५-१४ अशा स्थितीत बदललेला पवित्रा सिंधूला अडचणीत टाकणारा ठरला. वँगने सातत्याने फटक्यांमध्ये बदल केले आणि ते फटके सिंधूला परतवता आले नाहीत.
दुसऱ्या गेमला सिंधूने १-३ अशी पिछाडी भरून काढत मध्यंतरापर्यंत ११-६ अशी आघाडी मिळवली होती. मध्यानंतर सिंधू १३-९ अशी आघाडी टिकवून होती. मात्र, १३-१३ अशा बरोबरीनंतर वँगने पुन्हा एकदा आपला पवित्रा बदलला. दडपणाखाली सिंधू लय गमावून बसली आणि वँगने याचा फायदा घेत विजय साकार केला. सिंधूच्या पराभवामुळे भारताचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
