क्वालालम्पूर : पीव्ही सिंधूने मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत बुधवारी विजयी सलामी नोंदवली, तर सायना नेहवालला गाशा गुंडाळावा लागला. माजी विश्वविजेत्या सिंधूने दिमाखदार कामगिरीचे प्रदर्शन करीत थायलंडच्या जागतिक क्रमवारीत १०व्या क्रमांकावरील पोर्नपावी चोचूवाँगला २१-१३, २१-१७ असे नामोहरम केले. सिंधूने चोचूवाँगविरुद्ध आठव्या सामन्यापैकी पाचवा विजय मिळवला आहे. सातव्या मानांकित सिंधूची पुढील फेरीत थायलंडच्या फिट्टायापोर्न चायवानशी गाठ पडणार आहे. परंतु सायनाने अमेरिकेच्या इरिस वांगकडून ३७ मिनिटांत ११-२१, १७-२१ असा पराभव पत्करला.

पुरुष एकेरीत माजी राष्ट्रकुल विजेत्या पारुपल्ली कश्यपने दुखापतीतून सावरत सकारात्मक वाटचाल करताना कोरियाच्या हीओ क्वांग ही याला २१-१२, २१-१७ असे नमवले. जागतिक क्रमवारीत ३९व्या क्रमांकावरील कश्यपचा दुसऱ्या फेरीत थायलंडच्या कुनलावत विटिडसार्नशी सामना होणार आहे.

मिश्र दुहेरीत बी सुमीत रेड्डी आणि अश्विनी पोनप्पा जोडीला जागतिक क्रमवारीत २१व्या क्रमांकावरील नेदरलँड्सच्या रॉबिन टॅबेलिंग आणि सेलेना पीक जोडीचा अडथळा ओलांडण्यात अपयश आले. भारतीय जोडीने ५२ मिनिटांच्या संघर्षांनंतर १५-२१, २१-१९, १७-२१ अशी हार पत्करली.