इंग्लिश प्रीमिअर लीगच्या (ईपीएल) यंदाच्या हंगामात विजयी रथावर स्वार असलेल्या मँचेस्टर युनायटेडला सोमवारी स्वानसी सिटी क्लबने जमिनीवर आणले. बॅफेटीम्बी गोमीस व अ‍ॅण्ड्रे आयेव यांच्या प्रत्येकी एक गोलच्या बळावर स्वानसी सिटीने २-१ अशा फरकाने युनायटेडचा पराभव केला. सलग तिसऱ्यांदा स्वानसीने युनायटेडला पराभवाची चव चाखवली आहे.
पहिले सत्र गोलशून्य राहिल्यानंतर जुआन माटाने ४८व्या मिनिटाला गोल करून युनायटेडला आघाडी मिळवून दिली. मात्र, ६१व्या मिनिटाला अ‍ॅण्ड्रे याने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यात ६६व्या मिनिटाला गोमीसने गोल करून स्वानसीला आघाडीवर आणले आणि याच आघाडीसह विजयही निश्चित केला. या पराभवामुळे युनायटेडची विजयी मालिका खंडित झाली आहे आणि गुणतालिकेत त्यांची घसरणही झाली आहे.
गत सत्रात घरच्या मैदानावर व्यवस्थापक व्ॉन गाल यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या युनायटेडला १-२ अशाच फरकाने स्वानसी सिटीने नमवले होते आणि आता परतीच्या सामन्यातही त्याच फरकाने युनायटेडला पराभव पत्करावा लागला. या विजयामुळे स्वानसीने गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली असून माजी विजेत्या मँचेस्टर सिटीपेक्षा चार गुणांनी पिछाडीवर आहेत. स्वानसीने इतिहासात पहिल्यांदा सलग चार सामने जिंकून अव्वल संघांमध्ये स्थान पटकावले आहे.