नवी दिल्ली : हार्ड कोर्टवर खेळण्यासाठी साजेशी शैली असलेल्या पुण्याच्या मानस धामणेला प्रथमच भारताच्या डेव्हिस चषक टेनिस संघात स्थान देण्यात आले आहे. डेव्हिस चषकातील पात्रतेच्या पहिल्या फेरीत भारताने नेदरलँड्सवर ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने सप्टेंबरमध्ये सोल येथे दक्षिण कोरियाविरुद्ध होणार्‍या पात्रता फेरीतील दोन सामन्यांसाठी मुख्य संघात मोठे बदल करणे टाळले आहे.

जागतिक क्रमवारीत ३६२व्या स्थानी असणारा आणि एकेरीतील भारताचा दुसरा मानांकित खेळाडू मानस धामणे बर्‍याच काळापासून वरिष्ठ संघात स्थान मिळविण्याच्या प्रतीक्षेत होता. आता कोरियाविरुद्ध तो अनुभवी सुमित नागल (क्रमवारीत २३५वा) आणि दक्षिणेश्वर सुरेश (क्रमवारीत ३९३वा) यांच्यासह भारताच्या एकेरीची धुरा सांभाळेल. दुहेरीत युकी भांबरी (क्रमवारीत २८वा) आणि एन. श्रीराम बालाजी (क्रमवारीत ५७वा) ही जोडी भारताचे प्रतिनिधित्व करेल. राखीव खेळाडू म्हणून सिद्धार्थ रावत आणि पुण्याच्याच अर्णव पापरकरची निवड करण्यात आली आहे.

‘‘खेळाडूंची निवड त्यांच्या कामगिरीच्या आधारेच झाली आहे. गेल्या वेळी मानस उपलब्ध नव्हता. आता तो मुख्य संघात असला, तरी कर्णधार परिस्थिती पाहून एकेरीच्या संयोजनाचा निर्णय घेतील. अर्णवला भविष्याचा विचार करता राखीव खेळाडूंत स्थान देण्यात आले आहे,’’ असे निवड समितीच्या सदस्याने सांगितले.

नेदरलँड्सवर मिळवलेल्या विजयाने भारताने पात्रतेच्या दुसर्‍या फेरीत स्थान मिळवले. मुख्य संघात धामणेचा समावेश हा एकमेव बदल आहे. या सामन्यातील विजयी संघ नोव्हेंबरमध्ये डेव्हिस चषकाच्या अंतिम टप्प्याच्या अव्वल आठ संघांमध्ये स्थान मिळवेल. भारताकडे प्रथमच एलिट गटात पोहोचण्याची संधी आहे.

भारतीय संघ

’ एकेरी : सुमित नागल, दक्षिणेश्वर सुरेश, मानस धामणे

’ दुहेरी : युकी भांबरी, एन. श्रीराम बालाजी ’ राखीव : अर्णव पापरकर, सिद्धार्थ रावत