Manav Suthar Record: अफगाणिस्तानचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये कसोटी आणि वनडे मालिकेचा थरार सुरु आहे. एकमेव कसोटी सामन्याचा थरार मु्ल्लानपूरमध्ये सुरु आहे. या सामन्यात भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारताकडून २ फलंदाजांनी शतकं झळकावली. तर २ फलंदाजांनी दमदार अर्धशतकं झळकावली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने पहिला डाव ८ गडी बाद ५६४ धावांवर घोषित केला. दरम्यान या धावांचा बचाव करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून पहिलाच सामना खेळत असलेला मानव सुथार चमकला. या डावात गोलंदाजी करताना त्याने सर्वाधिक ६ गडी बाद केले. यासह त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर मानव सुथारला वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा त्याने पुरेपूर लाभ घेतला आहे. या डावात गोलंदाजी करताना त्याने २२ षटकांमध्ये अवघ्या ३३ धावा खर्च केल्या आणि अफगाणिस्तानच्या ६ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली आहे. यासह मानव सुथार हा कसोटी पदार्पणात ५ गडी बाद करणारा १० वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यासह सातवा फिरकी गोलंदाज ठरला आहे.

यासह मानव सुथारच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. मानव सुथारने कसोटी पदार्पणात भारताकडून खेळताना आतापर्यंतची दुसरी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. कसोटी पदार्पणात सर्वोत्तम कामगिरी करण्याचा रेकॉर्ड हा माजी गोलंदाज नरेंद्र हिरवाणी यांच्या नावावर आहे. हिरवाणी यांनी आपल्या कसोटी पदार्पणात १९८८ मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध झालेल्या सामन्यात गोलंदाजी करताना ८ गडी बाद ६१ धावा खर्च केल्या होत्या. कसोटी क्रिकेटमध्ये ३५ वर्षांनंतर कुठलाही गोलंदाज या रेकॉर्डच्या जवळपास पोहोचला आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने ५३४ धावांवर डाव घोषित केला. दुसऱ्या दिवशी फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तानला ५ गडी बाद ११३ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे तिसऱ्या दिवशी अफगाणिस्तानसमोर विकेट्स वाचवण्याचं आणि धावा करण्याचं आव्हान होतं. पण अफगाणिस्तानचे फलंदाज फार काळ मैदानावर टिकू शकले नाहीत. चौथ्या दिवसातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना मानव सुथारने शरफुद्दीन अशरफला अवघ्या ११ धावांवर बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर रहमत शाहला ६० धावांवर बाद केलं. यासह पदार्पणाच्या सामन्यात ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला. त्यानंतर मोहम्मद सलीमला बाद करत त्याने विकेट्सचा षटकार मारला.