इस्तंबूल : चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या अंतिम सामन्यात शनिवारी मँचेस्टर सिटी व इंटर मिलान हे संघ एकमेकांसमोर असतील, तेव्हा दोन्ही संघांचा प्रयत्न विजेतेपद मिळवण्याचा असेल. सिटीने गेल्या तीन वर्षांत दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे, तर इंटर मिलानचा हा पाचवा अंतिम सामना असेल. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चांगली चुरस पाहायला मिळेल. तीन जेतेपदे मिळवणाऱ्या इंटर मिलानचा प्रयत्न या वेळीही अजिंक्यपद मिळवण्याचा असणार आहे. सध्याचे संघाचे प्रशिक्षक सिमोन इंझागी यांच्या मार्गदर्शनाखाली संघ पहिल्यांदा अंतिम सामना खेळेल. इंटरने कठीण गटातून इथवर वाटचाल केल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला असेल. मँचेस्टर सिटीने या सामन्यात विजय मिळवल्यास ते मँचेस्टर युनायटेडच्या विक्रमाशी बरोबरी साधतील. एकाच हंगामात प्रीमियर लीग, एफए चषक आणि चॅम्पियन्स लीग जिंकणारा सिटी हा युनायटेडनंतरचा पहिला संघ ठरेल. इंटर मिलानच्या मार्टिनेझकडून अपेक्षा चॅम्पियन्स लीगची कार्यक्रमपत्रिका जाहीर झाली तेव्हा इंटरला सर्वात कठीण गट मिळाला होता. बायर्न म्युनिक, बार्सिलोना आणि इंटर संघांनी मिळून एकूण १४ जेतेपदे मिळवली होती. सुरुवातीच्या सामन्यांतील चांगल्या कामगिरीनंतर इंटरने लीगच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पोटरेविरुद्ध उपउपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या टप्प्यातील सामन्यात १-० असा विजय मिळवला आणि दुसऱ्या टप्प्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने त्यांनी १-० अशा गोल सरासरीसह आगेकूच केली. उपांत्यपूर्व फेरीत त्यांच्यासमोर बेन्फिकाचे आव्हान होते. पहिल्या टप्प्यातील सामना २-० असा जिंकल्यानंतर इंटरने दुसऱ्या टप्प्यातील सामना ३-३ असा बरोबरीत सोडवला. त्यामुळे ५-३ अशा गोल सरासरीने त्यांनी उपांत्य फेरी गाठली. एसी मिलानविरुद्धचा पहिल्या टप्प्यातील सामना २-० आणि दुसऱ्या टप्प्यातील सामना १-० असा जिंकत त्यांनी अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. अर्जेटिनाच्या लॉटारो मार्टिनेझने संघाच्या वाटचालीत आपले योगदान दिले आहे. त्यामुळे अंतिम सामन्यातही त्याच्या कामगिरीकडे लक्ष असेल. मँचेस्टर सिटीची मदार हालँडवर ’सिटीला जेतेपद मिळवायचे झाल्यास एर्लिग हालँडला चमकदार कामगिरी करावी लागेल. हालँडने या हंगामात ५२ गोल केले असून तो चांगल्या लयीत आहे. त्यामुळे संघाला त्याच्याकडून याच कामगिरीची अपेक्षा असेल. त्याने चॅम्पियन्स लीगमध्ये १२ गोल केले आहेत. ’सिटीने पहिल्या फेरीत बोरुसिया डॉर्टमंड, सेव्हिया आणि एफसी कोपनहेगन संघावर विजय नोंदवले आणि दोन सामने शिल्लक असतानाच त्यांनी उपउपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले. ’लॅपझिगविरुद्धच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात हालँडने निर्णायक भूमिका पार पाडली. त्याने या सामन्यात पाच गोल झळकावले व संघाने ७-० असा विजय नोंदवला. तसेच ८-१ अशा सरासरीने आगेकूच केली. त्यापूर्वी पहिल्या टप्प्यातील सामना १-१ असा बरोबरीत राहिला होता. ’हालँडपूर्वी अर्जेटिनाच्या लिओनेल मेसी आणि ब्राझीलचा आघाडीपटू लुईझ अॅड्रिआनो यांनी एकाच सामन्यात पाच गोल झळकावले होते. ’उपांत्यपूर्व सामन्यात बायर्न म्युनिकविरुद्ध ४-१ अशा गोल सरासरीने त्यांनी उपांत्य फेरी गाठली. पहिल्या टप्प्यातील सामन्यात सिटीने ३-० असा विजय नोंदवला. तर दुसऱ्या टप्प्यातील सामना १-१ असा बरोबरीत राहिला. ’उपांत्य फेरीत सिटीसमोर रेयाल माद्रिदचे आव्हान होते. त्यांच्यातील पहिल्या टप्प्यातील सामना १-१ असा बरोबरीत राहिल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील सामना ४-० असा जिंकत ५-१ अशा गोल सरासरीसह अंतिम फेरी गाठली. वेळ : मध्यरात्री १२.३० वा. थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स टेन २, ३