संपूर्ण हंगामात दिमाखदार प्रदर्शन करणाऱ्या मँचेस्टर सिटीने वेस्ट हॅमवर २-० अशा विजयासह इंग्लिश प्रीमिअर लीगच्या स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. सामनाधिकाऱ्यांनी निर्धारित वेळ संपल्याची खुण करताच सिटीचे खेळाडू आणि चाहत्यांच्या जल्लोषाला उधाण आले. प्रीमिअर लीग स्पर्धेचे सिटीचे हे दुसरे जेतेपद आहे. चिलीच्या मॅन्युअल पेलेगरिनी यांच्या मार्गदर्शनाखाली सिटीला मिळालेले हे पहिलेच जेतेपद ठरले. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लीग चषकाचे जेतेपद पटकावत सिटीच्या खेळाडूंनी आपल्या शानदार फॉर्मची चुणूक दाखवली होती.
जेतेपदापर्यंत पोहचण्यात सिटीसमोर लिव्हरपूलचा अडथळा होता. मात्र शेवटच्या दोन आठवडय़ात लिव्हरपूलची कामगिरी ढासळली. चेल्सीविरुद्ध त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले तर क्रिस्टल पॅलेसविरुद्ध बरोबरीत समाधान मानावे लागले. सिटीतर्फे पहिला गोल होण्याआधीच, न्यूकॅस्टलविरुद्धच्या लढतीत लिव्हरपूल पिछाडीवर पडल्याचे स्पष्ट झाले. यामुळे वेस्ट हॅमविरुद्धची लढत गमावली असती तरीही सिटीचा संघच जेतेपदाचा मानकरी ठरला असता. मात्र केवळ गणितीय समीकरणांच्या अवलंबून राहण्यापेक्षा समीर नरसी आणि व्हिन्सेंट कॉम्पनी यांच्या शानदार गोलच्या जोरावर सिटीने जेतेपदावर नाव कोरले. वेस्ट हॅमच्या बचावपटूंकडून झालेल्या चुकीचा फायदा उठवत समीर नरसीने चेंडूवर ताबा मिळवला. यानंतर वेस्ट हॅमचा गोलकीपर अॅड्रियनला चकवत नरसीने शानदार गोल केला. या गोलमुळे वेस्ट हॅमवरील दडपण वाढले. सर्जिओ ऑग्युरो, अलेक्झांडर कोलाराव्ह यांनी गोल करण्यासाठी थरारक प्रयत्न केले मात्र ते अपुरे ठरले. मध्यंतरानंतर झेकोने गोल कॉम्पनीच्या दिशेने नेला. कॉम्पनीने या संधीचे सोने करत सिटीला भक्कम आघाडी मिळवून दिली. वेस्ट हॅमच्या खेळाडूंनी प्रत्युत्तरादाखल गोल करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले मात्र सिटीच्या अभेद्य बचावामुळे ते यशस्वी ठरले नाहीत.