Manchester Super Giants Win The Hundred T20 Title: मँचेस्टर सुपर जायंट्सने अखेर पहिल्यांदाच ‘द हंड्रेड’ स्पर्धेचं पुरुष गटातील विजेतेपद पटकावलं आहे. सलग दोनदा अपयश आल्यानंतर अखेरीस जोस बटलरच्या नेतृत्त्वाखाली सुपर जायंट्स फ्रँचायझीने टी-२० लीगमध्ये पहिलं जेतेपद आपल्या नावे केलं. १६ ऑगस्टला खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात मँचेस्टर सुपर जायंट्सने ट्रेंट रॉकेट्सचा ५ गडी राखून पराभव केला. संघाला विजेतेपद मिळवून देण्यात सलामीवीर टिम सायफर्टने महत्त्वाची भूमिका बजावली; तो केवळ अंतिम सामन्याचाच नव्हे, तर संपूर्ण स्पर्धेचाही ‘स्टार’ ठरला.
शेवटच्या तीन चेंडूंवर तीन धावांची गरज असताना दोन चेंडू शिल्लक ठेवत मँचेस्टर सुपर जायंट्स संघाने अंतिम सामना जिंकत जेतेपदही पटकावलं. या स्पर्धेचा अंतिम सामना ट्रेंट रॉकेट्स आणि मँचेस्टर सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. जोस बटलरच्या नेतृत्वाखाली सुपर जायंट्सने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावण्यात यश मिळवलं.
‘द हंड्रेड’चा अंतिम सामना ट्रेंट रॉकेट्स आणि मँचेस्टर सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना, ट्रेंट रॉकेट्सने १०० चेंडूंमध्ये ८ गडी गमावून १५८ धावा केल्या; संघातील एकाही फलंदाजाला ५० धावांचा टप्पा गाठता आला नाही. एन्यूरिन डोनाल्डने १९ चेंडूंत ३८ धावांची उत्तम खेळी केली. त्यानंतर, मँचेस्टर सुपर जायंट्सने विजयाचे लक्ष्य गाठताना टिम सायफर्टने ३९ चेंडूंत ७२ धावांची धडाकेबाज खेळी केली. मात्र, त्यानंतर संघाची लय बिघडली.
संघाला शेवटच्या तीन चेंडूंवर तीन धावांची गरज होती आणि सामना अत्यंत चुरशीच्या वळणावर पोहोचला होता. तीन चेंडू शिल्लक असताना पहिल्या चेंडूवर लियाम डॉसनने षटकार मारून आपल्या संघाचा विजय निश्चित केला. ‘सुपर जायंट्स’ने टी-२० स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा आयपीएलमधील ‘एलएसजी’ (लखनऊ सुपर जायंट्स) हाच संघ आहे. जोस बटलर ‘मँचेस्टर सुपर जायंट्स’चे नेतृत्व करत होता आणि त्याने संघाला विजेतेपद मिळवून दिलं.
मँचेस्टर सुपर जायंट्सने २०२२ आणि २०२३ मध्ये उपविजेतेपद मिळवलं होतं आणि अगदी थोडक्यात जेतेपदाला मुकावं लागलं होतं, परंतु यंदा या संघाने अखेर तो दुष्काळ संपवण्यात यश मिळवलं आहे. जोस बटलरने यापूर्वी संघाला टी-२० विश्वचषक जिंकून दिला आहे आणि आता त्याने आणखी एक टी-२० लीगचं जेतेपद पटकावलं आहे.
