चीनमधील चेंगडू येथे सुरु असलेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेतील भारतीय महिलांचे आव्हान संपुष्टात आले आहे. भारतीय महिला संघ उपउपांत्यपूर्व फेरीतच गारद झाला. चायनीज तैपई संघाकडून भारताला ३-० असे पराभूत व्हावे लागले. रविवारी उझबेकिस्तानला नमवल्यानंतर महिला संघाने सोमवारी इजिप्तचे आव्हान सहज परतवून लावले होते. भारताच्या या विजयात श्रीजा अकुलाची कामगिरी निर्णायक ठरली होती.

चायनीज तैपईचे कडवे आव्हान मोडून काढण्यात भारतीय महिला संघाला अपयश आले. मनिका बत्रा हिला या स्पर्धेमध्ये सूर गवसला नाही. चेन झू यू हिच्याकडून मनिका हिला ११-७, ११-९, ११-३ (३-०) असे पराभूत व्हावे लागले. त्यानंतर बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील टेबल टेनिस खेळातील मिश्र गटात सुवर्णपदक पटकावणारी श्रीजा अकुला हिलाही अव्वल दर्जाचा खेळ करता आला नाही. चेंग चिंग हिने अकुला हिच्यावर ११-८, ५-११, ११-६, ११-९ (३-१) असा विजय साकारला. दिया चितळे हिने अखेरच्या लढतीत कडवी झुंज दिली, पण तिला काही विजय मिळवता आला नाही. लिऊ यीन हिने दियाचे कडवे आव्हान ११-६, ९-११, ९-११, ११-८, ११-७ (३-२) असे परतवून लावले.

हेही वाचा :   IND vs SA 1st ODI: भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट, काल पडला होता विक्रमी पाऊस

भारताची स्टार टेबल टेनिसपटू मनिका बत्राचा फॉर्म हा जवळपास आठ महिन्यांपासून खराब आहे. कॅनडा येथे जानेवारी- फेब्रुवारी दरम्यान झालेल्या स्पर्धेपासून ते आताच्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेपर्यंत तिच्या खेळत कुठलीही सुधारणा झाली नाही. बर्मिंघम मधील राष्ट्रकुल स्पर्धेतही तिला फारसा चांगला खेळ करता आला नाही. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ऑलिंपिकसाठी तिला आत्तापासूनच चांगली तयारी करावी लागेल. लवकरात लवकर तिला हरवलेला सूर परत आणावा लागेल.

हेही वाचा  : श्रीजेश, सविता सर्वोत्कृष्ट गोलरक्षक ; ‘एफआयएच’कडून सलग दुसऱ्या वर्षी सन्मान

जागतिक टेबल टेनिस स्पर्धेतील महिलांचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघाची मदार आता सर्वस्वी पुरुषांवर असणार आहे. भारताचा पुरुषांचा संघ उपउपांत्यपूर्व लढत उद्या खेळणार आहे. या वेळी भारतीय पुरुष संघासमोर चीनचे आव्हान असणार आहे.