Manish Pandey Catch Video: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ५७ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. रायपूरच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात विराट कोहलीच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून चेजमास्टर विराट कोहलीने दमदार शतक झळकावलं. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने हा सामना खिशात घातलं. विराटचं शतक तर या सामन्यात खास ठरलं, पण मनीष पांडेने घेतलेला कॅच या सामन्यातील मुख्य आकर्षण ठरला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मनीष पांडे हा तोच खेळाडू आहे जो आयपीएल स्पर्धेत शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला होता. पहिल्या हंगामापासून या स्पर्धेचा भाग असलेला मनीष पांडे या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग आहे. त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळालेली नाही. पण क्षेत्ररक्षणासाठी मैदानात येऊन तो संघासाठी मोलाचं योगदान देत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने असा काही भन्नाट कॅच घेतला, जे पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले.

मनीष पांडेचा भन्नाट कॅच

मनीष पांडे हा सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. त्याला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक का म्हटलं जातं हे त्याने अनेकदा आपल्या मैदानावरील कामगिरीने दाखवून दिलं आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर होता. पण तरीदेखील मनीष पांडेने पूर्ण जोर लावला. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून १८ वे षटक टाकण्यासाठी कार्तिक त्यागी गोलंदाजीला आला. या षटकातील पाचव्या चेंडूवर टिम डेव्हिडने पॉईंटच्या दिशेने वेगवान फटका मारला. नेमकं तेव्हाच टिम डेव्हिडने डाईव्ह मारली आणि एका हाताने डोळ्यांचे पारणे फेडणारा कॅच घेतला. हा कॅच पाहून स्वतः टिम डेव्हिड शॉक झाला. तर नॉन स्ट्रॉइकला असलेला विराट कोहली वॉव असं म्हणाला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विजय

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने १९२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून विराट कोहलीने नाबाद १०५ धावांची खेळी केली. तर देवदत्त पडिक्कलने ३९, जेकब बेथेलने १५ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हा सामना ६ गडी राखून आपल्या नावावर केला.