हा गेल्या आठवड्यातला प्रसंग. आयपीएल स्पर्धेत आरबीसीचा संघ जिंकण्याच्या उंबरठ्यावर होता. टोलेजंग फटकेबाजीसाठी प्रसिद्ध टीम डेव्हिडने चेंडू तटवला पण तो हवेत गेला. चेंडू पॉइंट क्षेत्रात तैनात क्षेत्ररक्षकाच्या बाजूने जाईल असं वाटलं. कोणाला काही कळायच्या आता त्या क्षेत्ररक्षकाने हवेतून उदी काढावी तसा चेंडू अक्षरक्ष: थांबवला आणि झेल टिपला. टीम डेव्हिड अवाक झाला. नॉन स्ट्रायकर एन्डला विराट कोहली होता. त्याचे डोळे विस्फारले. आरसीबीच्या डगआऊटमध्ये बसलेल्या मंडळींचाही विश्वास बसेना. गोलंदाज कार्तिक त्यागीने अजि म्या ब्रह्म पाहिले अवस्थेत डोळ्यावर हात ठेवले. झेल टिपणारा तो शिलेदार होता मनीष पांडे. क्षणार्धात कोलकाताचे खेळाडू त्याच्याभोवती जमले आणि हायफाईव्ह देऊ लागले. वाढवलेले केस बाजूला सारल्यावर हलकंच स्मितहास्य मनीषच्या चेहऱ्यावर झळकलं. तोवर विराट कोहली तिकडे पोहोचला. १९ वर्षांपूर्वी U19 वर्ल्डकप स्पर्धेतला साथीदार मनीषचा चित्त्यागत वावर पाहून त्याने मनीषचं कौतुक केलं. मान गए उस्ताद धर्तीचं आलिंगन दिलं. यंदाच्या हंगामातला तो सगळ्यात अविश्वसनीय पद्धतीचा झेल ठरला. आयपीएलमधल्या सार्वकालीन महान झेलांच्या यादीत मनीषची नोंद झाली.

बुधवारी इडन गार्डन्सच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर केकेआर सामना जिंकला. यंदाच्या हंगामात पहिल्यांदा मनीष पांडेला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. ३६व्या वर्षी कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात असणाऱ्या मनीषने सावध सुरुवात केली आणि नंतर कोलकाताच्या विजयाचा पाया रचला. आयपीएल पदार्पणापासून जसप्रीत बुमराहला या स्पर्धेत मनीषला बाद करता आलं नव्हतं. काल बुमराहने ती संधी साधली. मनीषला बाद केल्यावर त्याने साहजिकच सार्थ भावनेने आनंद व्यक्त केला.

दरवर्षी मार्च एप्रिल मे महिन्यात आयपीएल असतं. दोन महिने चालतं. यंदा या स्पर्धेचं १९वं वर्ष आहे. एका परीने या स्पर्धेने सज्ञानत्व प्राप्त केल्यानंतरचं पहिलंच वर्ष आहे. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी यांचा सत्कार करण्यात आला. आयपीएलचे सगळे हंगाम खेळणाऱ्या खेळाडूंचा तो सन्मान होता. यावेळी बीसीसीआय आणि आयपीएल प्रशासन मनीषला विसरलं. कारण दरवर्षी आयपीएल असतं तसंच मनीषही असतो. रोहित शर्माने डेक्कन चार्जर्सकडून खेळायला सुरुवात केली. अॅडम गिलख्रिस्टला रोहितमध्ये नेतृत्वगुण दिसले. मुंबई इंडियन्सकडे आल्यानंतर रोहितच्याच नेतृत्वात पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं. विराट आणि आरबीसी हे समानार्थी शब्द झाले. वर्षानुवर्षे तो धावांची टांकसाळ उघडत राहिला. गेल्यावर्षी पहिल्यांदा विराट आणि आरसीबीचं जेतेपदाचं स्वप्न पूर्ण झालं. महेंद्रसिंग धोनी चेन्नईवासीयांचा लाडका थाला झाला. धोनी दंतकथा सदरात गेला. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने पाच जेतेपदांची कमाई केली. ४४व्या वर्षीही चाहत्यांना, संघाला त्याने खेळत राहावं असं वाटतंय यातच सगळं आलं. आयपीएल स्पर्धा लोकप्रिय होण्यात, घरोघरी पोहोचण्यात, ब्रँड होण्यात या तिघांचा सिंहाचा वाटा आहे. या तिघांनी सातत्याने दमदार कामगिरी केली. संघाची मोट बांधली. स्वत:च्या उदाहरणातून संघासमोर वस्तुपाठ सादर केला. कोणत्याही स्पर्धेचे सलग १९हंगाम खेळणं अजिबातच सोपं नाही. भारतीय संघ ३६५पैकी ३०० दिवस खेळत असतो. ते वेळापत्रक सांभाळून दोन महिने प्रचंड उकाड्यात विमानतळ-स्टेडियम-हॉटेल ही कसरत सांभाळत चांगलं खेळणं शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. या तिघांनी ते निभावलं आणि शिखरावर गेले. या तिघांच्या तुलनेत मनीष न-नायक राहिला. या तिघांप्रमाणेच तो १९वर्ष स्पर्धेत आहे. त्याचं मुख्य काम फलंदाजी आहे. दुसरं काम म्हणजे तो अविश्वसनीय क्षेत्ररक्षण करतो. गोलंदाजी तो करत नाही. महान, दिग्गज म्हणावं असे मनीषचे आकडे नाहीत पण म्हणून सर्वसाधारण म्हणून निकाली काढावं इतकी वाईट आकडेवारी नाही. मनीष म्हणजे सदाबहार चैतन्याचं प्रतीक आहे. २००८ मध्येही तो जसा दिसायचा तसाच दिसतो. तितकाच फिट आहे आणि आजही संघाला जे हवंय ती भूमिका निभावण्याची त्याची तयारी आहे.

आयपीएल स्पर्धेत शतक झळकावणारा पहिला भारतीय कोण? असे प्रश्न क्विझ काँटेस्टमध्ये विचारले जातात. अनेकांना वाटतं सचिन असेल. काहींना वाटतं विराट असेल. काही म्हणतात रोहितच नक्की. काही राहुल द्रविडचं नाव घेतात, काही सौरव गांगुलीचं. पण यापैकी कुणीच नाहीये. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे- मनीष पांडे. अलीकडे आयपीएलमध्ये जवळपास दररोज शतक होतं त्यामुळे त्यातलं काठिण्य निघून गेलं आहे. कातळसदृश खेळपट्टीवर सामने होतात त्यामुळे बोलता बोलता शतक होतं. पण २००९ मध्ये देशात निवडणुका असल्यामुळे आयपीएलचा ताफा दक्षिण आफ्रिकेत होता. त्यावर्षी मनीष पांडेने शतक झळकावलं. आफ्रिकेतल्या चेंडूला उसळी मिळणाऱ्या खेळपट्ट्यांवर केलेलं ते शतक आयपीएलमधल्या संस्मरणीय शतकांपैकी एक आहे. योगायोग म्हणजे मनीषचं स्पर्धेतलं ते एकमेव शतक आहे. १९ हंगाम खेळल्यानंतरही मनीषच्या नावावर ते एकच शतक आहे.

पहिल्यावहिल्या हंगामात मनीष मुंबई इंडियन्स या स्टारडमवाल्या संघाचा भाग होता. त्यानंतरचे दोन हंगाम मनीष आरसीबी अर्थात बंगळुरू संघाचा भाग होता. त्यानंतर ४ वर्ष मनीष पुणे वॉरियर्स इंडिया संघाकडून खेळला. तिथून तो पूर्वेकडे गेला. चार हंगाम कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता. तेवढीच वर्ष सनरायझर्स हैदराबादचं प्रतिनिधित्व केलं. एक हंगाम नव्याकोऱ्या लखनौ सुपरजायंट्सकडूनही खेळला. वर्षभर दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात होता. शेवटची तीन वर्ष तो पुन्हा कोलकाताकडे आहे. १९ वर्षात मनीषचे ७ संघ झाले. दोनदा हंगामात त्याने ४००पेक्षा जास्त धावा चोपून काढल्या आहेत. २०१४ आणि २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने जेतेपदावर नाव कोरलं. त्या संघाचा मनीष अविभाज्य भाग होता. प्रदीर्घ अशा आयपीएल कारकिर्दीत मनीषने एकदा संघाचं नेतृत्वही केलं. नियुक्त कर्णधार नसला तरी फलंदाजीच्या बरोबरीने कर्णधाराला योग्य सल्ला देणं, युवा खेळाडूंना मार्गदर्शन करणं, चित्तथरारक झेल टिपणं, अचंबित पद्धतीने चेंडू अडवून धावांना वेसण घालणं हे मनीष वर्षानुवर्ष करतो आहे. आयपीएलच्या पटलावर नवख्या मंडळींचेही पॉडकास्ट तुम्हाला दिसतील पण इतकी वर्ष खेळूनही मनीषच्या मुलाखती तुम्हाला आढळणार नाहीत. ३६व्या वर्षीही त्याने राखलेला फिटनेस कमाल असा आहे. आयपीएलमध्ये १-२-३ क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजांना सर्वाधिक वेळ खेळायला मिळतं. मनीष या तीन नंबरात खेळत नाही. तो प्रामुख्याने मधल्या फळीत आणि प्रामुख्याने फिनिशरची भूमिका निभावतो. त्यामुळे अलीकडे त्याच्या वाटेला सामनेही फार येत नाहीत.

मनीषचं आयपीएल मानधन म्हणजे रोलर कोस्टर राईडच आहे. अगदी सुरुवातीला मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात असताना 6 लाख एवढंच त्याचं मानधन होतं. आरसीबीकडे आल्यानंतर त्याला प्रति हंगाम १२ लाख मिळू लागले. पुणेकर असताना त्याला प्रति हंगाम २० लाख रुपये मिळायचे. कोलकाताने त्याच्यासाठी १.७० कोटी रुपये मोजले. २०१८ मध्ये मनीषचं नशीब फळफळलं. हैदराबादने त्याच्याकरता ११ कोटी रुपये खर्च केले. चार वर्षात नशिबाचं पारडं फिरलं. लखनौ संघाने त्याच्यासाठी ४.६० कोटी रुपये मोजले. दिल्लीकडून खेळू लागल्यानंतर मानधन २.४० कोटी रुपयांवर आलं. कोलकाताने जुन्या शिलेदारासाठी ५० लाख रुपये मोजून ताफ्यात घेतलं. रिटेन करताना थोडी वाढ होऊन त्याला ७५ लाख रुपये मिळतात. कोटीच्या कोटी रुपये उड्डाणं सुरू असताना ही रक्कम मामुली वाटू शकते पण मनीषला पैशांची चिंता नाहीये.

१७९ आयपीएल सामन्यात मनीषच्या नावावर ३९८७ धावा आहेत. यंदा तो ४००० धावांचा टप्पा ओलांडेल. एक शतक आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे. स्ट्राईकरेट आहे १२१चा. फिनिशरची भूमिका निभावल्यामुळे २८ वेळा नाबाद राहिला आहे. आणखी एखादा हंगाम खेळल्यास झेलांची शंभरी तो पूर्ण करू शकतो. आयपीएल लिजंड खेळाडूंमध्ये मनीषचं नाव घेतलं जात नाही. सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्येही त्याचं नाव टॉप१० मध्ये नाही. पण युटिलिटी अर्थात उपयुक्तता या निकषावर मनीष अग्रणी आहे. संघाचं हित याला तो प्राधान्य देतो. बुधवारी सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर मनीषने त्याच्या रूटीनविषयी सांगितलं. मला अंतिम अकरात संधी मिळो अथवा न मिळो. फलंदाजीच्या बरोबरीने ४५ मिनिटं क्षेत्ररक्षणाचा सराव करतो. युवा खेळाडूंनी काही विचारलं तर मी सदैव उपलब्ध असतो. संघाला जिंकून देणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. संघाची जी आवश्यकता असेल ते करतो. मनीषच्या मनात खंत नाहीये. याउलट इतकी वर्ष खेळायला मिळाल्याबद्दल कृतज्ञता आहे.

आयपीएलच्या १९ वर्षांच्या कारकिर्दीदरम्यान मनीषचं भारताकडून खेळायचं स्वप्न पूर्ण झालं. ऑस्ट्रेलियात त्याच्या नावावर एक खणखणीत शतक आहे. २९ वनडे आणि ३९ टी२० सामन्यात त्याने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. पण भारतीय संघात स्थान पटकावण्यासाठी प्रचंड चुरस असल्याने मनीष कधी मागे पडला कळलंच नाही. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पॉवरहाऊस मानलं जाणाऱ्या कर्नाटक संघाचा तो वर्षानुवर्षे भाग होता. ११८ सामन्यात ५०च्या सरासरीने ७९७३ धावा त्याच्या नावावर आहेत. यामध्ये २५ शतकं आणि ३२ अर्धशतकांचा समावेश आहे. १९२ लिस्ट ए सामनेही तो खेळला आहे. तीनशेहून अधिक टी२० सामने त्याच्या नावावर आहेत.

अनेक वर्षांपूर्वी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता. मनीष पांडे आणि महेंद्रसिंग धोनी खेळत होते. धोनी ऐन भरात होता. एकेरी दुहेरी धावा घेण्यावर धोनीचा भर होता. त्यावेळी मनीषचं लक्ष दुसरीकडे असल्याचं धोनीने टिपलं. एरव्ही कॅप्टन कूल असणाऱ्या धोनीचा पारा चढला आणि त्याने शिवी हासडून मनीषला धावा पळण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं. या सामन्यात धोनी मनीषवर चिडला असला तर त्याच्याच नेतृत्वात तो सर्वाधिक खेळला. धोनी कर्णधार असतानाच मनीषने शतकी खेळी साकारली.

युट्यूबवर मनीष पांडे कॅच असा सर्च दिल्यावर दोन व्हीडिओ प्रामुख्याने समोर येतात. रणजी करंडक स्पर्धेत अभिषेक नायरला बाद करण्यासाठी तळपत्या उन्हात मनीषने लगावलेली डाईव्ह आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीदरम्यान डेव्हिड वॉर्नरला बाद करण्यासाठी हवेत उंच झेपावत टिपलेला झेल. इतक्या वर्षानंतरही हे व्हीडिओ वारंवार पाहिले जातात.

रोहित, विराट, धोनीसारखं यशोशिखर गाठणं मनीषला कदाचित जमलं नसेल. धावांची चळती त्याला उभ्या करता आल्या नसतील किंवा भारताचा नेक्स्ट बिग थिंग वगैरे होता आलं नसेल पण वर्षानुवर्षे तो त्याचं काम नेटाने करत राहिला. खाचखळगे येत राहिले मनीष मागे हटला नाही. म्हणूनच १९व्या हंगामात नायकांइतकीच या न-नायकाची चर्चा होते आहे.