भारताची कुस्तीपटू मनीषा भानवाला हिने अस्ताना येथे पार पडलेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. अंतिम सामन्यात तिने अमेरिकेच्या बलाढ्य अबीगेल नेटला पराभूत करत हे ऐतिहासिक यश संपादन केले. जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी ती पहिलीच भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. ‘हिंदूस्तान टाइम्स’ ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

अंतिम सामन्यात जबरदस्त पुनरागमन

५९ किलो वजन गटाच्या अंतिम फेरीत २९ वर्षीय मनीषासमोर पॅन अमेरिकन चॅम्पियन अमेरिकेच्या अबीगेल नेटचे आव्हान होते. सामन्याच्या पहिल्या सत्रात मनीषा १-६ अशी पिछाडीवर पडली होती. मात्र, दुसऱ्या सत्रात तिने जबरदस्त पुनरागमन करत आक्रमक चाली रचल्या. मनीषाने एकामागून एक गुण मिळवत सामना ८-६ असा जिंकला आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताला पहिले ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले.

भारताची आजवरची सर्वोत्तम कामगिरी

जरी ५९ किलो वजन गट हा ऑलिम्पिक श्रेणीत येत नसला, तरी महिला कुस्तीच्या इतिहासातील ही भारताची सर्वात मोठी कामगिरी मानली जात आहे. यापूर्वी २०२१ मध्ये अंशु मलिकने ५७ किलो वजन गटामध्ये अंतिम फेरी गाठत रौप्यपदक जिंकले होते. याशिवाय भारताची दिग्गज कुस्तीपटू विनेश फोगट आणि अंतिम पंघाल यांनी जागतिक स्पर्धेत प्रत्येकी दोन कांस्यपदके जिंकली आहेत.

पुरुष फ्रीस्टाईल कुस्तीचा विचार केला तर केवळ सुशील कुमारने २०१० मध्ये मॉस्को येथे ६६ किलो वजन गतात सुवर्णपदक जिंकले होते. आता मनीषा भानवाला ही सुशील कुमारनंतर जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी दुसरी भारतीय आणि पहिली महिला खेळाडू बनली आहे.

सुवर्णपदकापर्यंतचा संघर्षमय प्रवास

हरियाणाच्या जींद जिल्ह्यातील राहणाऱ्या २९ वर्षीय मनीषाने या स्पर्धेत सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले:

  • पहिली फेरी: जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या लॉरेन्स ब्यूरेगार्डला पराभूत करून धडक मारली.
  • उपांत्यपूर्व फेरी: मंगोलियाच्या बोलोरतुया खुरेलखूला चितपट करत आगेकूच केली.
  • उपांत्य फेरी: यजमान कझाकस्तानच्या अल्तीन शागायेवाला चितपट करत अंतिम फेरीत स्थान पक्के केले.

ऐशियन गेम्समधील निराशाजनक कामगिरीनंतर मनीषाने वजन गट बदलण्याचा निर्णय घेतला होता. अशियन गेम्समध्ये ५७ किलो गटात खेळणाऱ्या मनीषाने जागतिक स्पर्धेसाठी ५९ किलो गटात उतरण्याचा निर्णय घेतला आणि तिचा हा निर्णय ऐतिहासिक यश मिळवून देणारा ठरला.

भारतीय महिला कुस्तीपटूंचा दबदबा

या वर्षीची जागतिक अजिंक्यपद स्पर्धा भारतीय महिला कुस्तीपटूंसाठी अत्यंत यशस्वी ठरली आहे. मनीषाच्या सुवर्णपदकाव्यतिरिक्त ऑलिम्पिक वजन गटात नीलम सिरोही (५० किलो) आणि काजळ ढोचक (७६ किलो) यांनी अंतिम फेरीत धडक मारत रौप्यपदकांवर नाव कोरले.