Manjot Karla Arrested In Srilanka: श्रीलंकेत आजपासून लंका प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचा थरार सुरु होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना जाफना किंग्स आणि गॉल मार्व्हल्स या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना कोलंबोतील सिंहलीज स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सलामीच्या सामन्याआधी मोठी बातमी समोर येत आहे. भारताच्या अंडर १९ संघाचं प्रतिनिधित्व केलेला खेळाडू आणि जाफना किंग्स संघाचा सह संघमालक असलेला मनजोत कालरा याला श्रीलंकेच्या पोलिसांनी अटक केली आहे. मनजोत कालरावर एका खेळाडूला लाच देण्याचा आणि मॅच फिक्सिंग करण्याचा आरोप आहे. या आरोपावरुन श्रीलंकेच्या क्रीडा भ्रष्टाचारविरोधी पथकाने तातडीने कारवाई करत त्याला अटक केली आहे.
भारतीय संघाने २०१८ मध्ये झालेल्या अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेत फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून जेतेपदाचा मान पटकावला होता. या सामन्यात मनजोत कालराने दमदार शतकी खेळी केली होती. या शतकी खेळीनंतर तो प्रकाशझोतात आला. दरम्यान २०२६ च्या सुरुवातीलाच त्याने लंका प्रीमियर लीग स्पर्धेत संघ खरेदी करण्यासाठी गुंतवणूक केली. तो जाफना किंग्स संघाचा सह संघमालक आहे. श्रीलंकेच्या पोलिसांनी असा आरोप केला आहे की, कालराने एका खेळाडूला पैसे देऊन मॅच फिक्स करण्याचा प्रयत्न केला. तपासानंतर समोर आलेल्या माहितीनुसार, मनजोत कालराने स्पर्धा सुरु होण्याच्या १० दिवसांआधीच खेळाडूला संपर्क केला होता. संबधित खेळाडूने ही बाब अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर तपास करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी मनजोत कालराला अटक केली आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, पोलिसांनी असे सांगितले की , ही तक्रार श्रीलंकेचे क्रिकेटपटू अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे आणि दुनिथ वेल्लालागे यांनी नोंदवली आहे. हे तिघेही जाफना किंग्स संघातील खेळाडू आहेत. या स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. तर ८ ऑगस्टला स्पर्धेतील अंतिम सामना खेळवला जाणार आहे. लंका प्रीमियर लीग ही मॅच फिक्सिंग, लाचखोरी आणि भ्रष्टाचाराशी संबधित आरोपांमुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही मॅच फिक्सिंगच्या आरोपात एका फ्रँचायजीच्या मालकाला ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. यासह न्यायालयाने २४ दशलक्ष श्रीलंकन रुपयांचा दंड ठोठावला होता.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, लंका प्रीमियर लीग स्पर्धा नियोजित वेळेतच सुरु होणार. जर तपास पथकाला तपासादरम्यान कुठलीही गरज लागली, तर श्रीलंका क्रिकेट बोर्ड मदतीसाठी तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
