अनुभवी गोलरक्षक मॅन्युएल नॉयरने प्रशिक्षक ज्युलियन नागेल्समन यांच्या विनंतीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील निवृत्ती मागे घेताना आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी जर्मनी संघात पुनरागमन केले. ४० वर्षीय नॉयरने २०२४ युरो अजिंक्यपद स्पर्धेनंतर निवृत्ती घेतली होती. मात्र, त्याला आता कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिकेत होणार्या विश्वचषक स्पर्धेसाठी जर्मनीच्या २६ सदस्यीय संघात स्थान मिळाले आहे.
बार्सिलोनाचा गोलरक्षक मार्क-आंद्रे टेर स्टेगन याला नॉयरचा उत्तराधिकारी मानले जात होते, परंतु गेल्या काही काळापासून तो दुखापतींनी त्रस्त आहे. जानेवारीमध्ये बार्सिलोनाकडून गिरोना क्लबमध्ये (लोनवर) दाखल झाल्यापासून तो केवळ दोनच सामने खेळला आहे. अन्य गोलरक्षक ऑलिव्हर बाऊमनने जर्मनीसाठी ११ सामने खेळताना चांगली कामगिरी केली.
मात्र, आता नॉयरचे पुनरागमन हा त्याच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. नॉयरला १२४ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. २०१४ मधील विश्वविजेत्या जर्मनी संघाचा तो प्रमुख सदस्य होता. त्याची सर्वकालीन सर्वोत्तम गोलरक्षकांमध्ये गणना केली जाते. यामुळे प्रशिक्षक नागेल्समन यांनी त्याला निवृत्ती मागे घेण्याची विनंती केली.
नॉयरने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना २०२४च्या युरो स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत खेळला होता. यामध्ये स्पेनकडून अतिरिक्त वेळेत जर्मनीचा २-१ असा पराभव झाला होता. जर्मनी यंदा पाचव्या विश्वचषक विजेतेपदाच्या शोधात आहे. यंदाच्या स्पर्धेत जर्मनीचा ‘इ’ गटात समावेश असून ते आयव्हरी कोस्ट, इक्वेडोर आणि कारासाओ संघांशी साखळी सामना करणार आहेत. जर्मनीचा संघ ३१ मे रोजी फिनलंड आणि ६ जूनला अमेरिकेविरुद्ध सराव सामना खेळेल.
