दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जोहान्सबर्गच्या वॉँडरर्स स्टेडियमवर सुरू असलेला सामना दोन भावांसाठी खास ठरला आहे. जवळपास सात फूट उंचीचे सख्खे जुळे भाऊ मार्को आणि ड्युआन यान्सन हे पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामन्यात एकत्र खेळत आहेत. क्रिकेटच्या मैदानावर भाऊ एकत्रित खेळण्याची अनेक उदाहरणं आहेत. पण सख्खे जुळे भाऊ एकत्र खेळण्याचं हे अनोखं उदाहरण आहे. जुळे असल्यामुळे सारखेच दिसत असल्यामुळे नक्की कोण गोलंदाजी करत आहे असा पेच पंचांना पडू शकतो.
दक्षिण आफ्रिकेचे कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, ओटनिल बार्टमन आणि क्वेना मफाका हे चौघे वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त आहेत. यामुळे मार्को यान्सनकडे गोलंदाजी विभागाची धुरा आहे. प्रमुख चार गोलंदाज नसल्याने ड्युआनला संधी मिळाली आहे. मार्कोने कारकिर्दीची सुरुवात फलंदाज म्हणून केली असली तरी आता तो प्रमुख वेगवान गोलंदाज म्हणून संघात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या लढतीत मार्कोने विकेट्सच्या बरोबरीने अर्धशतकी खेळी करत ४ अफलातून झेल टिपले होते. मार्कोने २१ टेस्ट, ३३ वनडे आणि ३० टी२० सामन्यात आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे. आयपीएल स्पर्धेत मार्को पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स या संघांकडून खेळला आहे.
ड्युआनने ऑगस्ट महिन्यात टी२० तर काही दिवसांपूर्वी वनडे पदार्पण केलं आहे. फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये २९ सामन्यात त्याच्या नावावर ७४ विकेट्स आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे स्टीव वॉ आणि मार्क वॉ, न्यूझीलंडचे हॅमिश आणि जेमी मार्शल यांच्यासह इंग्लंडचे क्रेग आणि जेमी ओव्हर्टन ही जुळी भावंडं एकत्र खेळली आहेत. महिला क्रिकेटमध्ये अॅलेक्स आणि केट ब्लॅकवेल आणि क्याशोना आणि क्यासिआ या जुळ्या बहिणी एकत्र खेळल्या आहेत.
स्टॅनले आणि टिप स्नूक हे भाऊ १९०७ मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी खेळले होते. त्यानंतर ७ वर्षांनी डॅन आणि हर्बी टेलर एकत्र खेळले. त्याचवर्षी क्वेबेखा इथे रेगिनाल्ड आणि फिलीप हँड्स यांना एकत्र खेळण्याची संधी मिळाली. १९४८-५१ कालावधीत एरिक आणि अथोल रोवन एकत्र खेळले. पीटर आणि ग्रॅमी पोलॉक ही प्रसिद्ध जोडी २३ सामन्यात एकत्र खेळली. १९६४ मध्ये टोनी आणि डेव्हिड पिथे खेळले. गॅरी आणि पीटर कर्स्टन १६ सामन्यात एकत्र खेळले. आधुनिक काळात अॅल्बी आणि मॉर्ने मॉर्केल ४६ सामन्यात एकत्र खेळू शकले.
