Marco Jansen Catch: आयपीएल २०२६ स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार सुरू आहे. पाहिला सामना पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. न्यू चंदिगडमधील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु असलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्माची दमदार सुरुवात आणि शेवटी क्लासेनच्या बळावर सनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटकांअखेर ६ गडी बाद २१९ धावांचा डोंगर उभारला. यादरम्यान कर्णधार इशान किशनला बाद करण्यासाठी मार्को यान्सेनने भन्नाट झेल घेतला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मार्को यान्सेनने एका हाताने घेतला भन्नाट झेल
या सामन्यात हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. सलामीला आलेल्या ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी मिळून दमदार सुरुवात करून दिली. पावरप्लेच्या षटकात दोघांनी मिळून १०० धावा कुटल्या. हैदराबादला ९ व्या षटकात पहिला धक्का बसला. ज्यावेळी ट्रॅव्हिस हेड बाद झाला, त्यावेळी हैदराबादने १२० धावा केल्या होत्या.
हेड बाद झाल्यानंतर कर्णधार इशान किशन फलंदाजीला आला. त्याने दमदार सुरुवात केली. पण तो फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. हैदराबादकडून १४ वे षटक टाकण्यासाठी अर्शदीप सिंग गोलंदाजीला आला. या षटकातील शेवटच्या चेंडूवर इशान किशनने काऊ कॉर्नरच्या दिशेने मोठा फटका मारला. हा चेंडू वेगाने सीमारेषेच्या बाहेर जात होता.
पण इतक्यात मार्को यान्सेनने धावत आला आणि शेवटच्या क्षणी हात बाहेर काढून एका हाताने सोपा झेल घेतला. हा झेल पाहून इशान किशन देखील शॉक झाला. इशान किशन ज्यावेळी बाद झाला त्यावेळी त्याने १७ चेंडूत एक चौकार आणि एक षटकाराचा मदतीने २७ धावा केल्या होत्या.
हैदराबादने उभारला २१९ धावांचा डोंगर
हैदराबादकडून सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने ७४ धावांची खेळी केली. तर ट्रॅव्हिस हेड ३८ धावांवर माघारी परतला. इशान किशनने २७ धावा केल्या. तर हेनरिक क्लासेनने ३९ धावा केल्या. यासह हैदराबादने २० षटकात ६ गडी बाद २१९ धावा केल्या.
