पुनरागमन केलेल्या शारापोव्हाचे आव्हान चौथ्या फेरीत सेव्हास्टोव्हाकडून संपुष्टात

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा

उत्तेजकांचे सेवन केल्याप्रकरणी १५ महिन्यांच्या बंदीची शिक्षा भोगल्यानंतर अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या निमित्ताने मारिया शारापोव्हाने ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुनरागमन केले. परंतु काही वर्षांपूर्वी जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थान भूषवणाऱ्या शारापोव्हाची वाटचाल चौथ्या फेरीपर्यंतच मर्यादित राहिली.

आर्थर अ‍ॅश स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्यात लॅटव्हियाच्या १६व्या मानांकित अनास्तासिजा सेव्हास्टोव्हाने पाच वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या शारापोव्हाचे आव्हान ५-७, ६-४, ६-२ अशा फरकाने संपुष्टात आणले. २००६ मध्ये अमेरिकन स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या शारापोव्हाचा खेळ सेव्हास्टोव्हासमोर बहरलाच नाही. उपांत्यपूर्व फेरीत सेव्हास्टोव्हाची अमेरिकेच्या स्लोआनी स्टीफन्सशी गाठ पडणार आहे. स्टीफन्सने जर्मनीच्या ज्युलिआ जॉर्जेसचा ६-३, ३-६, ६-१ असा पराभव केला.

२०१६ च्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत मेल्डोनियम हे बंदी असलेले औषध घेतल्याप्रकरणी शारापोव्हावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर ती प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळत होती. पहिल्याच फेरीत शारापोव्हाने जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावरील सिमोना हॅलेपला नमवून आपल्या पुनरागमनाचा इशाराच जणू अन्य प्रतिस्पध्र्याना दिला होता. एप्रिल महिन्यात बंदी उठल्यानंतर शारापोव्हाला फ्रेंच आणि विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये सहभागी होण्याची संधी होती. परंतु दुखापत किंवा अन्य कारणास्तव तिला भाग घेता आले नव्हते. मात्र अमेरिकन खुल्या स्पर्धेत थेट प्रवेशिकेद्वारे तिने प्रवेश मिळवला. या स्पर्धेतील कामगिरीमुळे सध्या जागतिक क्रमवारीत १४६व्या स्थानावर असलेली शारापोव्हा शंभरच्या आसपास भरारी घेण्याची शक्यता आहे.

शापोव्हालोव्हचे आव्हान संपुष्टात

पुरुष एकेरीत स्पेनच्या १२ व्या मानांकित पाबलो कॅरेनो बुस्ताची अर्जेटिनाच्या २९ व्या मानांकित दिएगो श्वार्ट्झमनशी उपांत्यपूर्व फेरीत गाठ पडणार आहे. बुस्ताने कॅनडाच्या १८ वर्षीय डेनिस शापोव्हालोव्हचा ७-६ (७/२), ७-६ (७/४), ७-६ (७-३) असा पराभव केला. याचप्रमाणे श्वार्ट्झमननने फ्रान्सच्या १६व्या मानांकित ल्युकास पॉयलेला ७-६ (७/३), ७-५, २-६, ६-२ असे पराभूत केले.

तसेच दक्षिण आफ्रिकेचा २८ वा मानांकित केव्हिन अँडरसनचा अमेरिकेच्या १७ व्या मानांकित सॅम क्युएरीशी सामना होणार आहे. अँडरसनने इटलीच्या पावलो लोरेन्झीला ६-४, ६-३, ६-७ (४/७), ६-४ असे हरवले, तर क्युएरीने जर्मनीच्या २३ व्या मानांकित मिश्चा झ्वेरेव्हला ६-२, ६-२, ६-१ असे पराभूत केले.

व्हिनस-क्विटोव्हा यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना

मंगळवारी चेक प्रजासत्ताकची १३वी मानांकित पेत्रा क्विटोव्हा आणि अमेरिकेची नववी मानांकित व्हीनस विल्यम्स यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होणार आहे. दोन वेळा विम्बल्डन विजेत्या क्विटोव्हाने स्पेनच्या तिसऱ्या मानांकित गार्बिन मुगुरुझाला ७-६ (७/३), ६-३ असे पराभूत केले. तसेच तिसऱ्या अमेरिकन जेतेपदासाठी उत्सुक असणाऱ्या व्हीनसने जागतिक क्रमवारीत ३५ व्या स्थानावर असलेल्या स्पेनच्या कार्ला सुआरेझ नाव्हारोचा ६-३, ३-६, ६-१ असा पराभव केला. क्विटोव्हाची व्हीनसविरुद्धची कामगिरी ४-१ अशी सरस आहे. व्हीनसने वयाच्या ३७ व्या अमेरिकन स्पर्धेत कामगिरी उंचावली असून, २००२ नंतर प्रथमच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यास ती उत्सुक आहे. तिने यंदा ऑस्ट्रेलियन आणि विम्बल्डन स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवले आहे.

आठवडय़ाभराच्या कामगिरीकडे पाहिल्यास मी समाधानी आहे. ही वाटचाल अप्रतिम होती. पुनरागमनानंतर खेळताना शिकण्यासारखे खूप होते. मी माझा सर्वोत्तम खेळ दाखवला आणि त्याचाच मला अभिमान आहे.

– मारिया शारापोव्हा

पहिल्या आणि दुसऱ्या सेटमध्ये पूर्णत: शारापोव्हाचा खेळ अविश्वसनीय असा होता. मी प्रत्येक वेळी चेंडू तटवण्यासाठी झुंज दिली. ती मैदानावर कारकीर्दीतील सर्वोत्तम सामने खेळली होती. परंतु तरीही तिला हरवू शकतो, हा विश्वास माझ्याकडे होता.

– अनास्तासिजा सेव्हास्टोव्हा