रशियाची ३५ वर्षीय माजी महिला टेनिसपटू मारिया शारापोव्हाने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. टेनिस स्टार मारिया शारापोव्हाने चाहत्यांना मोठी बातमी दिली आहे. तिच्या ३५ व्या वाढदिवसानिमित्त शारापोव्हाने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की, लवकरच तिच्या घरी नवीन पाहुणा येणार आहे. यासंदर्भात एक फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

हा फोटो शेअर करत शारापोव्हाने कॅप्शनमध्ये छान सुरुवात!!! दोघांसाठी वाढदिवसाचा केक खाणे हे नेहमीच माझे वैशिष्ट्य राहिले आहे, असे म्हटले आहे. या फोटोमध्ये ती तिचा बेबी बंप दाखवताना दिसत आहे. खरे तर मारिया शारापोव्हा लवकरच आई होणार आहे.

मारिया शारापोव्हाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एका बीचवर असल्याचे दिसत आहे. यावेळी तिने ट्राउजरसह काळा चष्मा घातला आहे. शारापोव्हाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांची मोठी यादी आहे. ती दररोज तिचे नवीन व्हिडिओ आणि फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते.

मारिया शारापोव्हाने २०२० मध्ये टेनिस कोर्टला अलविदा म्हटले आहे. पाच वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन बनण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. मारिया शारापोव्हाने दोन फ्रेंच ओपन, एक विम्बल्डन, एक ऑस्ट्रेलियन ओपन आणि एक यूएस ओपन जिंकली आहे. टेनिस कोर्टला अलविदा केल्यानंतर मारिया शारापोव्हाने अलेक्झांडर गिल्केसशी लग्न केले. गिल्केस हे ब्रिटिश व्यापारी आहेत. शारापोव्हा सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहे. प्रिन्स हॅरीसोबत गिल्केसचे संबंध खूप चांगले आहेत. प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांच्या लग्नालाही तो पाहुणा म्हणून उपस्थित होता.

दरम्यान, मारिया शारापोव्हा ही उत्कृष्ट टेनिसपटू राहिली आहे. २००५ मध्ये ती जगातील पहिल्या क्रमांकाची टेनिसपटू बनली. पुढच्याच वर्षी २००६ मध्ये त्याने यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले. २००७ हे वर्ष तिच्यासाठी खूप वाईट होते. दुखापतीमुळे तिला खूप संघर्ष करावा लागला होता.