ग्रँड स्लॅम स्पध्रेचे जेतेपद पाच वेळा जिंकणाऱ्या मारिया शारापोव्हाला स्टॅनफोर्ड क्लासिक टेनिस स्पध्रेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश करण्यासाठी झगडावे लागले. कॅलिफोर्निया येथील स्टॅनफोर्ड येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात शारापोव्हाने अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडीवर ६-१, ४-६, ६-० असा विजय मिळवला.

‘‘गळाभेट घेऊन सर्वाचे आभार व्यक्त करावेसे मला वाटत आहे,’’ असे शारापोव्हा सामन्यानंतर म्हणाली. ‘‘जवळपास दोन वर्षांनंतर अमेरिकेत मी पहिला सामना खेळत आहे आणि हे माझ्यासाठी दुसरे घर आहे,’’ असेही ती म्हणाली. मार्च २०१५नंतर शारापोव्हा पहिल्यांदाच येथे खेळली. उत्तेजक द्रव्य सेवनात दोषी आढळल्यामुळे तिच्यावर १५ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती.

जागतिक क्रमवारीत १७१व्या स्थानावर घसरण झालेल्या शारापोव्हाला स्टॅनफोर्ड स्पध्रेत थेट प्रवेश मिळाला असून तिला ८०व्या स्थानावर असलेल्या ब्रॅडीकडून कडवी झुंज मिळाली. पहिला सेट सहज जिंकल्यानंतर ब्रॅडीने दुसऱ्या सेटमध्ये प्रतिकार करताना हा सेट घेत सामना १-१ असा बरोबरीत आणला. मात्र, शारापोव्हाने अनुभव पणाला लावताना तिसरा सेट जिंकून सामनाही खिशात टाकला. दुसऱ्या फेरीत तिला अमेरिकेच्या कायला डेयचा सामना करावा लागणार आहे. कायलाने जपानच्या मिसाकी डोईवर ६-४, ६-२ अशी सहज मात केली.