इंग्लंडच्या वनडे आणि टी२० वर्ल्डकप विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा वेगवान गोलंदाज मार्क वूडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. वूडने १४६ सामन्यांमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधित्व करताना २५३ विकेट्स घेतल्या आहेत. २०१९ वनडे वर्ल्डकप आणि २०२२ टी२० वर्ल्डकप विजेत्या संघाचा वूड अविभाज्य भाग होता. २०१५ मध्ये इंग्लंडने अ‍ॅशेस मालिका जिंकली होती. त्या मालिकेतही वूडने छाप उमटवली होती.

वूडला कारकिर्दीत सातत्याने दुखापतींनी सतावलं. मात्र प्रत्येकवेळी दुखापतीतून पुनरागमन करत वूडने वेगाच्या जोरावर प्रतिस्पर्धी फलंदाजांना जेरीस आणलं. इंग्लंडच्या श्रीलंकेविरुद्धच्या लढतीपूर्वी वूडने निवृत्तीची घोषणा केली. दुखापतीमुळे खेळत नसताना वूडने समालोचक आणि पॅनेलिस्ट म्हणून नवी ओळख प्रस्थापित केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असली तरी डरहॅम संघासाठी टी२० ब्लास्ट स्पर्धेत खेळणार असल्याचं वूडने सांगितलं. लेव्हल३ कोचिंग परीक्षेसाठी अभ्यास करत असल्याचंही वूडने सांगितलं. इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी वूडचा करार तीन वर्षांसाठी होता. त्या कराराची मुदत पुढच्या आठवड्यात संपणार होती. कराराचं नूतनीकरण होणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर वूडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला.