Marnus Labuschagne On Pink Ball Contrversy In PSL: पाकिस्तान सुपर लीग २०२६ स्पर्धेला गुरूवारपासून सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात असं काही घडलं आहे, जे याआधी क्रिकेटमध्ये क्वचितच घडलं असावं. स्पर्धेच्या ११ व्या हंगामातील पहिला सामना लाहोर कलंदर्स आणि हैदराबाद किंग्समेन या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यातील सुरुवातीच्या २ षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर पांढऱ्या रंगाचा चेंडू अचानक गुलाबी झाला. हे पाहून हैदराबाद किंग्समेन संघाचा कर्णधार मार्नस लबुशेनने अंपायरकडे तक्रार केली. अंपायर्स देखील हे पाहून आश्चर्यचकीत झाले होते. अंपायर्सने चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला. दरम्यान सामना झाल्यानंतर मार्नस लबुशेनने या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
क्रिकेटमध्ये चेंडूवरील चकाकी कायम ठेवण्यासाठी चेंडू कपड्यावर घासला जातो. हे सामान्य आहे. पण चेंडू घासताना कपड्याचा रंग चेंडूला लागणं हे मी पहिल्यांदाच अनुभवलं अशी प्रतिक्रिया हैदराबाद किंग्समेन संघाचा कर्णधार मार्नस लबुशेनने दिली आहे. मार्नस लबुशेन हे पाहून आश्चर्यचकीत झाला होता.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मार्नस लबुशेन म्हणाला, “दुसरं षटक संपल्यानंतर मी अंपायर्सकडे गेलो आणि त्यांना म्हटलं, हे काय सुरू आहे? चेंडू पूर्ण लाल झाला आहे. हे कपड्यांमुळेच झालं असावं. मी माझ्या आयुष्यात याआधी असं कधीच पाहिलं नव्हतं.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “जेव्हा चेंडू पॅडला जाऊन लागतो किंवा बॅटला जाऊन लागल्यानंतर चेंडूचा रंग निघून जातो, हे मी पाहिलं आहे. पण कपड्यांमुळे चेंडूचा रंग बदलला हे मी पहिल्यांदाच पाहिलं. मी आशा करतो, येणाऱ्या सामन्यांमध्ये असं काही होणार नाही, याची ते काळजी घेतील.” दुसऱ्याच षटकात चेंडूचा रंग बदलल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या घटनेमुळे पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानची चांगलीच फजिती झाली आहे.
या सामन्यात लाहोर कलंदर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या संघाकडून फलंदाजी करताना फखर जमानने दमदार अर्धशतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर लाहोर कलंदर्स संघाने १९९ धावांचा डोंगर उभारला. धावांचा पाठलाग करताना हैदराबाद किंग्समेन संघातील फलंदाज फ्लॉप ठरले. हैदराबाद किंग्समेन संघाचा डाव २० षटकात १३० धावांवर आटोपला. पहिल्या डावात ५३ धावांची खेळी करणारा फखर जमान या सामन्यात सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
