इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अ‍ॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या कसोटीत जो रूटने उत्कृष्ट शतक झळकावत इंग्लंडचा डाव सावरला. तर दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात इंग्लंडचा संघ ३३४ धावांवर सर्वबाद झाला. मार्नस लबुशेनने भन्नाट झेल टिपत जोफ्रा आर्चरला बाद केलं, ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

इंग्लंडचा संघ पहिल्या दिवसाच्या अखेरीस ९ बाद ३२५ धावांवर होता. तर दुसऱ्या दिवशी मार्नस लबुशेनच्या झेलमुळे इंग्लंड फक्त ९ धावा करत ३३४ धावांवर बाद झाला. तर जो रूट नाबाद १३८ धावा करत परतला. जोफ्रा आर्चरचा होता, जो ३८ धावांवर बाद झाला आणि मार्नस लबुशेनने त्याला बाद करण्यासाठी सुपरमॅन स्टाईल कमालीचा झेल टिपला.

इंग्लंडच्या डावातील ७७व्या षटकात आर्चर बाद झाला. ब्रेंडन डोगेटच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर आर्चर शॉर्ट आर्म पुल शॉट खेळायला गेला आणि चेंडू बॅटवरही चांगला आला होता. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जाताना दिसताच लबुशनेने चित्त्याच्या वेगाने चेंडूकडे झेप घेतली आणि हवेतच कमालीचा झेल टिपला. लबुशेनच्या या झेलचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

जो रूटच्या वादळी शतकाच्या जोरावर इंग्लंडने गाबा पिंक बॉल कसोटीत ३३४ धावा केल्या आहेत. जो रूटने ऑस्ट्रेलियात त्याचं पहिलं कसोटी शतक झळकावलं. बेन डकेट व ओली पॉप शून्यावर बाद झाल्यानंतर रूटने संघाचा डाव उचलून धरला. झॅक क्राऊले आणि जो रूट यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी करत डाव सावरला. क्राऊलीने ९३ चेंडूत ७६ धावा केल्या.

यानंतर रूट आणि हॅरी ब्रुक यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी खेळी केली. ब्रुकने ३३ चेंडूत ३१ धावा केल्या. यानंतर जो रूटने त्याच्या कसोटी कारकिर्दीती ४०वं शतक केलं आहे. रूट २०६ चेंडूत १५ चौकार व एका षटकारासह १३८ धावांची खेळी करत नाबाद परतला.