कसोटीचा फलंदाज असा शिक्का बसल्याने मार्नस लबूशेनचा ऑस्ट्रेलियाच्या टी२० संघासाठी विचारदेखील होत नाही. टी२० संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली तेव्हा लबूशेनला टी२० पदार्पणाची संधी देण्यात आली. त्यालाही आता चार वर्ष झाली आहेत. याच लबूशेनला नुसतं संघात नव्हे तर कर्णधार करण्याचं पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतील हैदराबाद किंग्जमेन व्यवस्थापनाने ठरवलं. किंग्जमेन संघाचंही पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतलं पहिचंच वर्ष. त्यांनी धाडसी निर्णय घेण्याचं ठरवलं. टी२० प्रकारापासून दूर असलेला आणि तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ख्याती असलेल्या मार्नस लबूशेनकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. लबूशेनने फलंदाज आणि कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध केलं आणि किंग्जमेन संघाने पदार्पणाच्या हंगामात फायनलमध्ये धडक मारली.

रविवारी लाहोर इथे झालेल्या फायनन मुकाबल्यात पेशावर झाल्मीने किंग्जमेन संघाला नमवत जेतेपदावर नाव कोरलं. झाल्मी संघाचं या स्पर्धेचं हे दुसरं जेतेपद आहे. पहिल्याच हंगामात फायनलपर्यंत धडक मारणाऱ्या किंग्जमेन संघाचं आणि प्रामुख्याने कर्णधार लबूशेनचं क्रिकेटविश्वात कौतुक होत आहे.

लबूशेनने ऑस्ट्रेलियासाठी एकमेव टी२० सामना खेळला आहे. आयपीएल लिलावात त्याचं नाव होतं मात्र तो अनसोल्ड ठरला. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बिग बॅश टी२० लीग स्पर्धेच्या गेल्या तीन हंगामात मिळून तो फक्त सहा सामने खेळला आहे. ३१ वर्षीय लबूशेनने कारकिर्दीत आतापर्यंत कोणत्याही पातळीवर टी२० संघाचं नेतृत्व केलेलं नव्हतं. मात्र किंग्जमेन संघाने काहीसा विचित्र पण धाडसी निर्णय घेतला. मात्र लबूशेनने किंग्जमेन संघाचा आणि चाहत्यांचा विश्वास जिंकल्याचं चित्र आहे.

लबूशेन वर्ल्डकपविजेत्या संघाचा भाग आहे. प्रतिष्ठेच्या अ‍ॅशेस विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा भाग आहे. ६३ टेस्ट आणि ६६ वनडेत त्याने ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व केलं आहे. स्टीव्हन स्मिथचा शागीर्द अशीही त्याची ओळख आहे. च्युइंग गम चघळत खेळपट्टीवर नांगर टाकून मोठी खेळी रचण्यासाठी लबूशेन प्रसिद्ध आहे. क्षेत्ररक्षण करताना गंमतीदार गोष्टी करत प्रतिस्पर्धी फलंदाजांचं चित्त विचलित करण्यातही तो माहीर आहे. हे असलं तरी लबूशेनचा टी२० संघासाठी विचार झालेला नाही. किंग्जमेन संघातील खेळाडूंनी लबूशेनच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आहे. किंग्जमेन संघाचे प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू जेसन गिलेस्पी यांनीही लबूशेनच्या नेतृत्व गुणांचं कौतुक केलं आहे. ‘फलंदाज म्हणून लबूशेनचं कर्तृत्व आपण सगळेच जाणतो. पण या स्पर्धेत त्याने स्वत:ला उत्तम कर्णधार म्हणून सिद्ध केलं. ही स्पर्धा, हा संघ, वातावरण हे सगळंच मार्नससाठी नवीन होतं पण अतिशय अल्पावधीत त्याने सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. संघातल्या प्रत्येकाशी त्याने संवाद साधला. खेळाडूंच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणारा कर्णधार हा विश्वास त्याने संपादन केला’, असं गिलेस्पी म्हणाले.

विशेष म्हणजे सुरुवातीच्या ४ सामन्यात किंग्जमेन संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. चार सामने गमावल्यानंतर दिमाखात पुनरागमन करत किंग्जमेन संघाने बादफेरीसाठी पात्र होण्याचा मान मिळवला. लबूशेनने १३ लढतीत १३०च्या स्ट्राईकरेटने खेळताना ३४४ धावा केल्या. यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश आहे.

‘आम्ही चुकांमधून शिकलो’

‘आम्ही स्पर्धेत सुरुवातीचा चाचपडलो पण नंतर आम्हाला लय गवसली. आम्ही आमच्या चुकांमधून शिकलो. एकमेकांसाठी खेळायला शिकलो असं लबूशेनने सांगितलं. टी२० खेळाडू म्हणून किंवा टी२० संघाचा कर्णधार म्हणून माझा कुणीच विचार केला नाही पण किंग्जमेन संघाने वेगळा विचार केला. माझ्यासाठी ही मोठी संधी होती. संघाची मोट बांधणं आव्हानात्मक होतं पण फायनलपर्यंतची वाटचाल अतिशय आनंददायी आणि समाधानी होती. संघातील प्रत्येकाने योगदान दिल्यामुळे फायनपर्यंत धडक मारू शकलो. यंदाच्या हंगामाच्या असंख्य आठवणी सदैव माझ्याबरोबर असतील. अतिशय कमी कालावधीत आम्हाला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं. टेस्ट आणि वनडे नियमित खेळत असल्यामुळे मी फारसं टी२० क्रिकेट खेळत नाही. पण पाकिस्तान सुपर लीगमुळे मलाही टी२० प्रकारात खेळण्यासाठी काय बदल करावे लागतात ते समजलं’, असं लबूशेनने फायनलनंतर बोलताना सांगितलं.

आडनाव कसं उच्चारायचं?

लबूशेनच्या नावावरून सोशल मीडियावर असंख्य मीम्स तयार झाले आहेत. Marnus Labuschagne यातल्या आडनावाचा उच्चार लबूशेन असा केला जातो. खुद्द क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ‘how to pronounce Marnus Labuschange’ असा एक गंमतीदार व्हीडिओ तयार केला होता. त्याच्या टीममेट्सना आता कसा उच्चार करायचं कळलंय परंतु प्रतिस्पर्ध्यांना अजूनही उमगलेलं नाही. प्रत्येकजण आपापल्या संदर्भ-आकलनानुसार त्याचं नाव उच्चारतात.

लबूशेनचा जन्म आफ्रिकेतला. क्लेर्स्कड्रॉप भागात तो लहानाचा मोठा झाला. आफ्रिकाना ही त्याची मातृभाषा. त्याचे वडील खाण उद्योगात काम करायचे. लबूशेन दहा वर्षांचा असताना कुटुंबासह त्यांनी ऑस्ट्रेलियाला स्थलांतर केलं. क्वीन्सलँडमध्ये ते सगळे राहू लागले.

इंग्रजी येत नसल्याने काही कळायचं अशी परिस्थिती बरेच दिवस होती. २००५ची अ‍ॅशेस मालिका पाहून लबूशेनने क्रिकेटमध्येच करिअर करायचं ठरवलं. पण ऑस्ट्रेलियासारख्या ठोस स्पोर्ट्स कल्चर असणाऱ्या देशात तो सोपं नव्हतं. प्रामुख्याने बॅट्समन जो कामचलाऊ बॉलिंग करू शकतो हे लबूशेनचं गुणवैशिष्ट्य. क्वीन्सलँड अकादमीच्या माध्यमातून त्याने स्वत:ला घडवलं.

हॉटस्पॉट ऑपरेटर ते भरवशाचा फलंदाज

क्रिकेटपटू म्हणून घडत असताना २००९ मध्ये अ‍ॅशेस मालिकेदरम्यान ब्रिस्बेन टेस्टमध्ये लबूशेनने हॉटस्पॉट कॅमेरा ऑपरेटर म्हणून काम केलं. ‘हॉट स्पॉट’ हे क्रिकेटमधलं तंत्रज्ञान आहे. बॅट्समनची बॅट, ग्लोव्ह्ज, पॅड यांच्यापैकी कशाचा बॉलला संपर्क झाला आहे की नाही हे ठरवण्यासाठी इन्फ्रारेड इमेजिंग सिस्टम वापरली जाते त्याचं नाव ‘हॉट स्पॉट’. या यंत्रणेसाठी मैदानात अनेक कॅमेरे बसवले जातात. त्यापैकी एका कॅमेरा ऑपरेट करण्याची जबाबदारी लबूशेनने पार पाडली. या कामासाठी क्रिकेट आणि टेक्नॉलॉजी या दोन्हीचं ज्ञान आवश्यक होतं.

या कामादरम्यान लबूशेनने ऑस्ट्रेलियाच्या पीटर सिडलने घेतलेल्या हॅट्ट्रिकचा आनंदही लुटला. या कामासाठी त्याला दिवसाला ९० डॉलर्स मिळायचे. तरुण कार्यकर्त्यासाठी ही रक्कम मोठी होती. त्याने तेही काम चोखपणे केलं. क्रिकेटपटू म्हणून वाटचाल सुरूच राहिली.डोमेस्टिक क्रिकेटमध्ये फार ऐतिहासिक कामगिरी नसतानाही लबूशेनला २०१८मध्ये पाकिस्तानविरुद्ध दुबईत पदार्पणाची संधी देण्यात आली. पहिल्या डावात लबूशेनला भोपळाही फोडता आला नाही. मात्र दुसऱ्या मॅचमध्ये पाच विकेट्स घेत उपयुक्तता सिद्ध केली.

२०१९ अ‍ॅशेस मालिकेत स्टीव्हन स्मिथ बाऊन्सरवर दुखापतग्रस्त झाला आणि लबूशेनला काँकशन सबस्टिट्यूट म्हणून संधी मिळाली. पहिल्याच चेंडूवर त्यालाही जोफ्रा आर्चरच्या वेगवान चेंडूचा तडाखा बसला. वैद्यकीय चमूने त्याला तपासलं. खेळू शकण्यासाठी फिट असल्याचं सांगितलं. त्या क्षणापासून लबूशेनने धावांची टांकसाळ उघडली. ५९, ७४, ८०, ६७, ११, ४८, १४, १८५, १६२, १४३, ५०, ६३, १९, २१५, ५९.लबूशेन आजच्या घडीला ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज आहे. मध्यंतरी निवडसमितीचा सलामीवीराचा शोध सुरू होता. मनासारखा सलामीवीर न मिळाल्याने लबूशेनला सलामीलाही पाठवण्यात आलं. पाकिस्तान सुपर लीगमधील संघव्यवस्थापनाने लबूशेनला टी२० संघाचा कर्णधार केला पण ऑस्ट्रेलियाच्या निवडसमितीने लबूशेनचा टेस्ट किंवा वनडेत एकदाही कर्णधार म्हणून विचार केलेला नाही. लबूशेन पॅट कमिन्स, आरोन फिंच, स्टीव्हन स्मिथ, जोश हेझलवूड, मिचेल मार्श, टीम पेन यांच्या नेतृत्वात खेळला आहे. पीएसएलमधील कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाच्या निवडसमितीचं मत परिवर्तन होऊ शकतं.

सचिन तेंडुलकरने केलं होतं कौतुक

ऑस्ट्रेलियात वणवा पीडितांसाठीच्या चॅरिटी मॅचनिमित्त सचिन तेंडूलकर गेला असता त्याने मार्नसच्या स्तुती केली होती. त्याच्या खेळात मी स्वतःलाच पाहिलं अशी दाद सचिन तेंडुलकरने दिली आहे. “अ‍ॅशेस मालिका मी पाहत होतो. जोफ्रा आर्चरचा बॉल मार्नस लबूशेनच्या हेल्मेटवर जाऊन आदळला तो मी पाहिला. त्यानंतर पुढची पंधरा मिनिटं लबूशेनने ज्या पध्दतीने बॅटिंग केली ते त्याच्या अव्वल दर्जाची साक्ष देणारं होतं. त्याचं तंत्रकौशल्य, पदलालित्य अफलातून होतं. त्याला पाहताना मी मलाच पाहतोय असा भास झाला. हा विशेष प्रतिभाशाली खेळाडू आहे याचा मला प्रत्यय आला”, असं मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी म्हटलं होतं.